मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक
By Admin | Updated: November 1, 2015 21:42 IST2015-11-01T21:36:58+5:302015-11-01T21:42:52+5:30
राम कुलकर्णी : सावाना बालभवनचे पारितोषिक वितरण

मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक
नाशिक : लहान मुलांमध्ये असलेले चैतन्य आणि ऊर्जा वाखाणण्याजोगी असते. त्यांना प्रोत्साहन देणे ही पालकांची आणि शिक्षकांची जबाबदारी आहे, असे मत नाशिकरोड बिटको महाविद्यालयाचे प्राचार्य राम कुलकर्णी यांनी सार्वजनिक वाचनालय नाशिक साने गुरुजी कथामाला बालभवन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात व्यक्त के ले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. राम कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शिक्षणाबरोबरच विविध भाषा बोलण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. प्रादेशिक भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्लिश भाषांसह आपल्या देशातील किमान एक भाषा अवगत असावी, तसेच विदेशी भाषा शिकण्याचे कसबही अंगी बाणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सावाना बालभवनतर्फे आयोजित या पारितोषिक वितरण समारंभात शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पावसाळी कविता गायन स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, कथाकथन स्पर्धांमध्ये विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रा. राम कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी जादूगार विजय राज यांच्या जादूच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. विजय राज यांनी दाखविलेल्या जादूच्या प्रयोगांना सभागृहातील बालमित्रांनी टाळ्या वाजवून दिलखुलास दाद दिली.
या पारितोषिक वितरण समारंभात व्यासपीठावर रमेश जुन्नरे, अण्णासाहेब बेळे, डॉ. आशा कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन बालभवन विभागप्रमुख गिरीश नातू यांनी, तर आभार डॉ. आशा कुलकर्णी यांनी मानले. यावेळी वासुदेव दशपुत्रे, नरेश महाजन, मिलिंद जहागिरदार, सुरेश गायधनी, जयप्रकाश जातेगावकर, प्रकाश वैद्य आदि उपस्थित होते.