नाशिक : येथील तपोवन या धार्र्मिक पर्यटनस्थळावर एका फिरस्त्या इसमाच्या डोक्यात दगड टाकून अज्ञात संशयितांकडून हत्त्या करण्यात आल्याचे सोमवारी (दि.३) सकाळी उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. साधुग्राम प्रवेशद्वारापासून काही अंतरांवर झाडांमध्ये मृतदेह आढळून आला.याबाबत मिळालेली माहिती अशी, आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवनात एका ४० वर्षीय युवकाच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आल्याचे सकाळी या भागात काही नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी तत्काळ आडगाव पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले असून मुळ हरसूल गावातील रहिवासी असलेला संतोष रामकृष्ण पवार असे मयत इसमाचे नाव असल्याचे समोर आले आहे. येथील झाडांमध्ये असलेल्या एका राहूटीजवळ संतोषचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आले तसेच तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने वर्मी घाव लागून त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले. रविवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा घडला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. याबाबत परिसरात माहिती घेतली जात असून अज्ञात हल्लेखोरांच्या शोधात गुन्हे शोध पथक रवाना झाले आहे. एका फिरस्ती करणाऱ्या इसमाच्या हत्त्या करण्यामागील कारण नेमके काय? याचा पोलीस शोध घेत आहेत.
तपोवनात डोक्यात दगड टाकून इसमाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:15 IST
रामसृष्टी उद्यानात असलेल्या एका राहूटीजवळ संतोषचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले.
तपोवनात डोक्यात दगड टाकून इसमाची हत्या
ठळक मुद्देहल्लेखोरांच्या शोधात गुन्हे शोध पथक रवाना मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश