Nashik Police : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दुचाकीवर दिसल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केला होता. बीड पोलिसांसह एसआयटीची विविध पथके कृष्णा आंधळेचा महाराष्ट्रासह परराज्यातही शोध घेत असताना कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा सुरू झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. परंतु आंधळे याच्याबाबत स्थानिकांनी केलेल्या दाव्याला नाशिक पोलिसांनी मात्र दुजोरा दिलेला नाही.
स्थानिक नागरिकांनी केलेल्या दाव्यानुसार कृष्णा आंधळे याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण दिवसभर याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता. मात्र यामध्ये कुठलेही तथ्य आढळून आले नाही, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले आहे.
नेमका काय होता स्थानिकांचा दावा?
आज सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील सहदेव नगर येथील दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळेसारखा दिसणारा एक तरुण आपल्या मित्रासह बाईकवरून फिरत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असून सीसीटीव्हीमध्येही दोन संशयित तरुण फिरताना दिसत होते. यातील एक कृष्णा आंधळे असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु यामध्ये तथ्य नसल्याचं आता पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी स्पष्ट केलं आहे.