नेहरू नागरी अभियानांतर्गत विकासकामांत अनियमितता
By Admin | Updated: July 7, 2016 00:28 IST2016-07-06T23:47:49+5:302016-07-07T00:28:12+5:30
चौकशीची मागणी : गोदाप्रेमीचे निवेदन

नेहरू नागरी अभियानांतर्गत विकासकामांत अनियमितता
नाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत मनपामार्फत राबविण्यात आलेल्या विकासकामांत प्रथमदर्शनी मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोप गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे देवांग जानी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला असून, याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
जानी यांनी निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत महापालिकेमार्फत भुयारी गटार, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, पावसाळी पाणी व्यवस्थापन, गोदावरी घाटविकास योजना आदि विविध प्रकल्प राबविण्यात आले आहेत. परंतु डीपीआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे व मंजूर योजनेप्रमाणे कामे न करता भलत्याच स्वरूपाची कामे करण्यात आली आहे. गोदावरी विकासासाठी आलेल्या निधीचा गैरवापर झालेला आहे. महापालिकेच्या एप्रिल २०१४ च्या अहवालानुसार ८४ कोटींची कामे प्रलंबित आहेत. मंजूर निधी आणि झालेल्या पूर्णत्वाच्या कामांतील फरकही ५८.७५ कोटींच्या आसपास असून, यूएलबी ३० टक्के अंतर्गत निधीपेक्षा अतिरिक्तचा निधी १२५.७४ कोटी रुपये वापरलेला आहे. सदरची विकासकामे प्रत्यक्षात झाली आहे काय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. नेहरू अभियानांतर्गत विकासकामांची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी, अशी मागणी जानी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)