प्रभाग ४५ मध्ये दूषित पाणीपुरवठा
By Admin | Updated: March 30, 2016 23:12 IST2016-03-30T23:11:35+5:302016-03-30T23:12:01+5:30
मनपा सिडको विभाग : अधिकाऱ्यांना देणार गढूळ पाणी भेट

प्रभाग ४५ मध्ये दूषित पाणीपुरवठा
सिडको : येथील प्रभाग क्रमांक ४५ मधील पंडितनगर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मनपाच्या संबंधित विभागास कळवूनही दखल घेतली जात नसल्याने महिलावर्गाने तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाचा निषेध केला आहे.
सिडको भागात मनपाच्या वतीने गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असून दिवसेंदिवस तक्रारींमध्ये वाढ होत आहे. परंतु यानंतरही मनपाच्या संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. सिडकोतील प्रभाग ४५ मधील पंडितनगर, मोरवाडी या भागात गेल्या पंधरा दिवसांपासून गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पाण्यामुळे लहान बालकांसह मोठ्या व्यक्तींना पोटदुखीचा त्रास होत आहे. याबाबत परिसरातील महिलांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली. यावेळी शिवसैनिक देवा वाघमारे, दिगंबर नगरकर, सखूबाई आढाव, विमल जोरे, मीरा ढगे, निर्मला भुजबळ, निर्मला विश्वकर्मा, ज्योती सगर, गीता कुंभकर्ण, जयश्री कपिले यांसह महिला उपस्थित होत्या. (वार्ताहर)