पांडवनगरीत अनियमित पाणीपुरवठा
By Admin | Updated: March 26, 2015 23:24 IST2015-03-26T23:24:01+5:302015-03-26T23:24:18+5:30
नागरिक त्रस्त : टॅँकर पाठविण्यासही पालिकेची टाळाटाळ

पांडवनगरीत अनियमित पाणीपुरवठा
इंदिरानगर : प्रभाग ५४मधील पांडवनगरी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत आहे. ऐन उन्हाळ्यात भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यानंतर अरेरावीची उत्तरे दिली जात आहेत.
महापालिकेच्या वतीने कितीही सुरळीत पाणीपुरवठा केल्याचा दावा केला जात असला, तरी शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत असतोच. अनेक भागात वजनदार नगरसेवकांच्या दबावानुसार पाण्याच्या वेळा बदलत असतात. सध्या तर महापालिकेने सातपूर आणि सिडको विभागात एक महिनाभर पाणीपुरवठा कमी दाबाने आणि कमी वेळ होणार असल्याचे घोषित करून टाकले आहे. इतकेच नव्हे, तर त्यासाठी महापालिकेने अधिकाऱ्यांंचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत. परंतु तरीही त्याचा उपयोग होत नाही. पांडवनगरी परिसरातील नागरिकांना हाच अनुभव येत आहे.
पांडवनगरी परिसरात सध्या सुमारे सहाशे फ्लॅट्सची वसाहत आहे. त्यात बहुतेक सरकारी कर्मचारी आहेत. सुमारे पंधरा वर्षांपासून या वसाहतीला पाण्याचा प्रश्न सतावत आहे. अनेकदा आंदोलने करूनही उपयोग झालेला नाही. गेल्या आठ दिवसांपासून पाणीप्रश्न उग्र झाला आहे. अल्प दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना गरजेइतकेही पाणी मिळत नाही. त्यामुळे नोकरदारवर्गाचे हाल होत आहेत.
महापालिकेने जाहीर केलेल्या भ्रमणध्वनीवर टॅँकर पाठविण्यासाठी संपर्क साधल्यानंतर त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याचा क्रमांक देणे आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनी ‘माझा संबंध नाही, माझा नंबर कोणी दिला’ अशी उर्मट उत्तरे देतात आणि आपले नावही सांगत नसल्याची तक्रार आहे. (वार्ताहर)