अनियमित पुरवठ्यामुळे उद्योजकांना टँकरने पाणी

By Admin | Updated: October 13, 2015 22:28 IST2015-10-13T22:22:21+5:302015-10-13T22:28:59+5:30

तक्रारी : वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

Irregular supply leads to industrial water tankers | अनियमित पुरवठ्यामुळे उद्योजकांना टँकरने पाणी

अनियमित पुरवठ्यामुळे उद्योजकांना टँकरने पाणी

सिन्नर : माळेगाव आणि मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतीत गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने उद्योजकांना टॅँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली असल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे. यामुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासंदर्भात माळेगाव येथील निमा हाऊसमध्ये उद्योजक, निमाचे पदाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी व वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांनी पाण्यासंदर्भात तक्रारींचा पाढा वाचला. व्यासपीठावर निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष अरुण चव्हाणके, अतिरिक्त चिटणीस आशिष नहार, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश बंडोपिया, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता डी. टी. सायनेकर, सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, उपाध्यक्ष पंडित लोंढे, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शिंदे येथील वीज उपकेंद्रात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा अनियमित होत असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगून वीज मंडळाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वारंवार होणाऱ्या जबाबदारी ढकलण्याच्या प्रकारामुळे निमाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. वारंवार होणारे ब्रेकडाऊन कसे टाळता येतील यावर बैठकीत चर्चा झाली. शिंदे गावचा खंडित होणारा वीजपुरवठा एका रिंग सर्किटकडून घेऊन भविष्यात होणारे प्रकार कसे कमी करता येईल याबाबत चर्चा झाली. जुने पंप बदलून नवीन बसविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता बंडोपिया यांनी दिली. त्याचबरोबर १० किलोमीटरपर्यंतची पाइपलाइन बदलण्यासंदर्भात प्रस्ताव असून, ते काम लवकरच सुरू होईल, असे ते म्हणाले. माळेगाव एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्राची ६ एमएलडी एवढी क्षमता वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वीज वितरणकडून नव्याने विकसित होत असलेल्या कंपन्यांसाठी नवीन वीज उपकेंद्र लवकरच सुरू करणार असल्याचे सहाय्यक अभियंता नीलेश रोहनकर यांनी सांगितले.
बैठकीस पी. के. पाटील, व्ही. आर. पाटील, एस. पी. मिश्रा, विवेक पुरी, मनीष निकुंभ, रोहन एखंडे, एस. के. नायर, रवींद्र राठोड, योगेश मोरे, एल. एस. डोळे, स्वप्निल डोम्हने, आर. एस. सांगळे, एम.जी. कुलकर्णी, किरण खाबिया आदिंसह उद्योजक उपस्थित होते. अरुण चव्हाणके यांनी सूत्रसंचालन केले. आशिष नहार यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Irregular supply leads to industrial water tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.