लोखंडी तिजोऱ्यांची कवडीमोल भावात विक्री?

By Admin | Updated: July 23, 2016 00:52 IST2016-07-23T00:46:31+5:302016-07-23T00:52:59+5:30

जिल्हा बॅँक : काही संचालक येणार गोत्यात

Ironish safes sold in tandem? | लोखंडी तिजोऱ्यांची कवडीमोल भावात विक्री?

लोखंडी तिजोऱ्यांची कवडीमोल भावात विक्री?

नाशिक : नोकर भरती, लोखंडी तिजोऱ्या खरेदी, सीसीटीव्ही खरेदी आदि सर्व प्रकरणांची विभागीय सहनिबंधकांनी विशेष अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू केलेली असतानाच, आता बॅँकेच्या जुन्या मात्र सुस्थितीतील लोखंडी तिजोऱ्यांची कवडीमोल
भावात विक्री केल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या वाहत्या गंगेत काही संचालकांनीही लाखोंची
तिजोरी हजारात विकत घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा
आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीच जिल्हा बॅँकेच्या २१ पैकी ११ संचालकांची डोकेदुखी वाढली आहे. या अकरा संचालकांवर अपात्रतेची कुऱ्हाड केव्हाही कोसळण्याची चिन्हे आहेत. असे असतानाच विभागीय सहनिबंधकांनीच जिल्हा बॅँकेच्या विविध खरेदीची आणि आर्थिक अनियमितता व नोकर भरतीची धुळ्याचे विशेष जिल्हा लेखा परीक्षकांकरवी चौकशी सुरू केल्याने सर्वच संचालकांंचे धाबे दणाणले आहे; मात्र त्यातही २१ पैकी काही संचालकांनी या सर्व खरेदींना तसेच बॅँकेने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अर्थकारणाला विरोध केल्याची चर्चा आहे. हे विरोध करणारे संचालक या चौकशीतून सहीसलामत सुटण्याची शक्यता असली तरी, बहुतांश सदस्यांवर या खरेदीमुळे जबाबदारी निश्चित होऊन कोट्यवधी रुपयांची वसुली निघू शकते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने काही महिन्यांपूर्वीच तब्बल पावणेदोन लाख रुपयांना लोखंडी तिजोऱ्यांची खरेदी केली; मात्र जिल्हा बॅँकेच्या काही शाखांमध्ये जुन्या व सुस्थितीत असलेल्या लोखंडी तिजोऱ्या कवडीमोल भावात विक्रीसाठी काढण्यात आल्याची चर्चा आहे. या जुन्या सुस्थितीतील लोखंडी तिजोऱ्या काही संचालकांनी अवघ्या तीन ते चार हजारांत विकत घेतल्याचे बोलले जात असून, या लोखंडी तिजोरी विक्रीची चर्चा जिल्हा बॅँकेच्या वर्तुळात आहे. एकीकडे लाखो रुपयांच्या तिजोऱ्या विकत घ्यायच्या आणि दुसरीकडे अवघ्या काही हजारांत लोखंडी तिजोऱ्यांची विक्री करायची, या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ironish safes sold in tandem?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.