केएफएस कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक
By Admin | Updated: October 31, 2015 00:17 IST2015-10-31T00:17:19+5:302015-10-31T00:17:31+5:30
ग्रामीण गुंतवणूकदार : पोलिसांत गुन्हा दाखल

केएफएस कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक
नाशिक : केबीसी, समृद्धी इन्व्हेस्टमेंट, विकल्प ट्रेड सोल्यूशन यासारख्या कंपन्यानी गुंतवूणकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची उदाहरणे आहेत़ या कंपन्यांमध्ये आता संभाजी चौकातील केएफएस मल्टि सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची भर पडली आहे़ गुंतवणुकीवर बँकेपेक्षा अधिक व्याजदर व फायद्यांचे आमिष दाखवून या कंपनीने गुंतवणूकदारांची सुमारे ४० लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी दिली आहे़ यातील बहुतांशी गुंतवणूकदार हे निफाड तालुका व ग्रामीण भागातील आहेत़
निफाड तालुक्यातील दात्याने येथील गोरखनाथ पोपटराव गुरगुडे (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सोमनाथ बंड नेहे (रा़ गाव नाव माहिती नाही) यांनी केएफएस मल्टि सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली़ या कंपनीचे कार्यालय संभाजी चौकातील बाफणा ज्वेलर्ससमोरील एनडीए टॉवरमध्ये आहे़ बँकेपेक्षा अधिक व्याजदर व इतर फायदे देण्याचे आमिष दाखवून संशयित नेहे यांनी गुरगुडे यांची मार्च २०१४ पासून आतापर्यंत १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली़
केएफएसने गुरगुडे यांचे साथीदार रमेश तुळशीराम गांधी (रा़सुकेणे), हरी अण्णा थेटे (रा़दात्याने), अल्तिफ सय्यद अमजद अतीफ (रा़सय्यद पिंप्री), समीर इस्माईल सय्यद (रा़आडगाव), दिगंबर जनार्दन राऊत, रावसाहेब बाळासाहेब मोरे (शिरसगाव), देवीदास जयराम मोरे (थेरगाव) या सर्वांची मिळून एकूण ४० लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करून या पैशांचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षण कायद्यान्वये कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)