बड्या सराफी व्यावसायिकांची चौकशी
By Admin | Updated: January 19, 2017 01:21 IST2017-01-19T01:20:45+5:302017-01-19T01:21:04+5:30
तपासणी : नोटाबंदीनंतर सोने विक्रीत वाढ

बड्या सराफी व्यावसायिकांची चौकशी
नाशिक : नोटाबंदीच्या घोषणेनंतर मोठ्या प्रमाणात सोने विक्रीचे व्यवहार केलेल्या राज्यातील सुवर्ण व्यावसायिकांची आयकर विभागाने यादी तयार केली आहे़ यामध्ये नाशिकमधील तीन बड्या सराफी व्यवसायिकांचा समावेश असून, बुधवारी (दि़ १८) दुपारी आयकर विभागाने या सराफी व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये जाऊन सोने विक्री व्यवहाराची चौकशी केली़ यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यावसायिकावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री चलनातील पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बाद केल्याची घोषणा केली़ या घोषणेनंतर नाशिक शहरातील काही सराफी व्यावसायिकांची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू होती़ तसेच नोटाबंदीच्या कालावधीत सोने विक्रीत भरमसाठ वाढ झाल्याने सराफी व्यावसायिकांनी ग्राहकांकडून चलनातील जुन्या नोटा स्वीकारून व्यवहार केले वा धनादेशाद्वारे व्यवहार केले याची आयकर विभागाकडून चौकशी सुरू केली होती़ नोटाबंदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे व्यवहार झालेल्या राज्यातील ५४१ सराफी व्यावसायिकांची यादी आयकर विभागाने तयार केली आहे़ आयकर विभागाच्या यादीमध्ये नाशिक शहरातील तीन बड्या सराफी व्यावसायिकांचा समावेश असून, त्यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले आहेत़ बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आयकर विभागाने या दुकानांवर पथक पाठवून त्यांची व्यवहार तपासणी सुरू केली़ या सराफी व्यावसायिकांनी खरेदी केलेले व विक्री केलेले सोने, दुकानात शिल्लक असलेल्या सोन्याची मोजदाद, सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना रोख वा धनादेश यापैकी कशाने केले़ यासाठी जुने चलन किती स्वीकारले, त्यांच्या बँकेचे खाते पुस्तक, व्यवहारांची कसून चौकशी केली जाते आहे़ (प्रतिनिधी)
आयकर विभागाने या तिघा सराफी व्यावसायिकांची दुकाने सील केली नसून दुकानातील खरेदी-विक्री व्यवहाराचे दफ्तर ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे़ बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू राहणार असून, सराफी व्यावसायिकांच्या व्यवहारांमध्ये तफावत आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे़ या धडक कारवाईमुळे शहरातील इतर सराफी व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे़ दरम्यान, याबाबत सराफी व्यावसायिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही़