पंचवटीतील दंगलखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू
By Admin | Updated: February 25, 2017 23:42 IST2017-02-25T23:42:18+5:302017-02-25T23:42:34+5:30
ठाकरे स्टेडिअम : दंगलीचे व्हिडिओ चित्रीकरण; फुटेजची तपासणी

पंचवटीतील दंगलखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू
नाशिक : हिरावाडीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअममध्ये सुरू असलेल्या प्रभाग क्रमांक तीनच्या मतमोजणीप्रसंगी इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप करून मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून रस्त्यावरील उभ्या दुचाकींची तोडफोड करणाऱ्या दंगलखोरांचा व्हिडिओ चित्रीकरणाच्या आधारे पंचवटी पोलिसांनी शोध सुरू केला आहे़
गुरुवारी (दि़२३) मतमोजणीच्या दिवशी हिरावाडीतील ठाकरे स्टेडिअमबाहेर दंगलखोरांनी घातलेल्या गोंधळाची मोबाइल क्लिप पंचवटी पोलिसांना मिळाली आहे़ या मोबाइल क्लिपच्या आधारे पोलिसांनी दंगल घडवून आणण्यास कारणीभूत असणाऱ्या सुमारे ३० ते ३५ संशयितांवर गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी संशयित विशाल कदम, अमोल कदम, हेमंत अहिरराव, कुंदन वैद्य यांना अटक केली आहे़ न्यायालयाने या संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे़ ठाकरे स्टेडिअममध्ये मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम मशीनमध्ये घोळ केल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने संकुलाबाहेर तीव्र घोषणाबाजी करून पोलिसांवर दगडफेक केली़ या दगडफेकीत पोलीस वाहनांसह दुचाकींचेही नुकसान तर झालेच शिवाय सात पोलीस कर्मचारीही जखमी झाले़ तसेच प्रक्षुब्ध जमावास पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत तीन वेळा गोळीबारही करावा लागाला़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दंगल घडवून आणणे, बेदम मारहाण, शासकीय कामात अडथळा यांसह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ मतमोजणीच्या वेळी स्टेडिअमबाहेर उसळलेल्या दंगलीचे काही नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले होते़ या चित्रीकरणाच्या व्हिडिओ क्लिप तसेच संशयितांचे फोटो पोलिसांच्या हाती लागले असून, त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला आहे़ (प्रतिनिधी)