सादरे आत्महत्त्या प्रकरणी तपास सुरूच
By Admin | Updated: October 25, 2015 00:01 IST2015-10-25T00:01:20+5:302015-10-25T00:01:21+5:30
सादरे आत्महत्त्या प्रकरणी तपास सुरूच

सादरे आत्महत्त्या प्रकरणी तपास सुरूच
नाशिक : जळगाव येथील पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्येप्रकरणी पोलीस सखोल तपास करीत असून, त्यांच्या मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे हा तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त व तपासी अधिकारी विजयकुमार चव्हाण यांनी दिली.
सादरे यांनी गळफास घेण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर चौधरी यांनी केलेल्या छळास कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटले आहे़
सहायक पोलीस आयुक्त चव्हाण यांनी प्रारंभीच सादरे कुटुंबीय व शेजारी राहणाऱ्या नागरिकांचे जबाब घेतले आहेत़ तसेच सादरे यांच्या जळगाव येथील सहकाऱ्यांकडूनही माहिती घेतली आहे. नाशिक पोलिसांचा सादरे यांनी चिठ्ठीमध्ये केलेल्या आरोपांनुसार तपास सुरू असून, ते कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यांमधून विविध कागदपत्रे गोळा करण्यात आली आहे़ या कागदपत्रांच्या छाननीचे काम सुरू असून, यामध्ये सर्वप्रथम तपास व पुराव्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
या कागदपत्रांनुसार गुन्हा सिद्ध झाल्यानंतर संशियत अधिकाऱ्यांच्या अटकेचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)