स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र सुरू
By Admin | Updated: November 10, 2015 23:12 IST2015-11-10T23:11:36+5:302015-11-10T23:12:31+5:30
आरटीओ कार्यालय : महिन्याभरासाठी रिइन्स्पेक्शन फी माफ

स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र सुरू
पंचवटी : गेल्या चार ते पाच दिवसांपासून संतप्त वाहनचालक मालकांनी आटीओ कार्यालयातील बंद पडलेले स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र अखेर पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले.
वाहन तपासणी दरम्यान फेल झालेल्या वाहनांचा पुनर्तपासणीनंतर प्रादेशिक परिवहन विभागाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, त्यानुसार आता स्वयंचलित वाहन चाचणीसाठी केंद्रात वाहने तपासणी झाल्यानंतर ती फेल झाली, तर सलग दोन वेळेसाठी किंवा महिन्यांसाठी इन्स्पेक्शन फी माफ करण्यात आलेली आहे.
वाहनाची दुरुस्ती केल्यानंतरदेखील स्वयंचलित यंत्रावर वाहने फेल होतात असे सांगत पुनर्तपासणीसाठी पैसे मोजावे लागतात व वेळेचा अपव्यय होतो. यामुळे यंत्रणा बंद करण्याची मागणी करून वाहनचालक व मालकांनी आरटीओ कार्यालयात गोंधळ घालून काही दिवसांपूर्वी स्वयंचलित यंत्रणा बंद पाडली होती. सलग दोन दिवस यंत्रणा बंद असल्याने वाहने तपासणीसाठी कार्यालयाबरोबर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. अखेर दोन दिवसांसाठी पूर्वीप्रमाणे तपासणी करण्यात आली होती.
वाहनचालकांनी गोंधळ घालू नये, तसेच कायद्या व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी आरटीओ कार्यालयातील स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त नेमून स्वयंचलित यंत्रणा सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. (वार्ताहर)