नगरसेवकासह एकाची चौकशी

By Admin | Updated: July 25, 2016 00:36 IST2016-07-25T00:36:18+5:302016-07-25T00:36:39+5:30

वाघ खून प्रकरण : परदेशी गँगला मदत, सहभाग निश्चितीनंतर गुन्हे दाखल

Interrogation with a corporator | नगरसेवकासह एकाची चौकशी

नगरसेवकासह एकाची चौकशी


नाशिक : हनुमानवाडी कॉर्नरवरील वाघ खून प्रकरणानंतर मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या पंचवटीतील परदेशी गँगला मदत केल्याच्या संशयावरून महापालिका नगरसेवक पवन पवार व रिपाइंचा शहराध्यक्ष अर्जुन पगारे या दोघांचीही सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी शनिवारी (दि़२३) सुमारे पाच तास चौकशी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली़ गुन्हेगारांना पाठबळ तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू असून, त्याअंतर्गत ही चौकशी करण्यात आली़ दरम्यान, चौकशीत सहभाग आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे़
पंचवटीतील सराईत गुन्हेगार टोळी परदेशी गँगने २७ मे रोजी हनुमानवाडी कॉर्नरवर सुनील वाघ या तरुणाचा खून केला होता़ या प्रकरणानंतर पोलिसांनी सराईत गुन्हेगार कुंदन सुरेश परदेशी (२४, दळवी चाळ, खंडेराव मंदिराजवळ, हनुमानवाडी), अक्षय कैलास इंगळे (२१, शिवशक्ती अपार्टमेंटशेजारी हनुमानवाडी), अजय जेठा बोरीसा (२५, फ्लॅट नंबर ६, चैतन्य हौसिंग सोसायटी, रामवाडी), करण रवींद्र परदेशी (२०, दळवी चाळ खंडेराव मंदिराजवळ, हनुमानवाडी),मयूर शिवराम कानडे (२३, फ्लॅट नंबर १, शारदा सरस्वती सोसायटी, मेहेरधाम), श्रीनिवास सुरेंद्र कानडे (२३, फ्लॅट नंबर २४ बी, दिव्यदर्शन सोसायटी, विसेमळा, कॉलेजरोड), मयूर गोपाल भावसार (१९, सिद्धकला रो-हाऊस यशोदानगर मेहेरधाम), आकाश विलास जाधव (१९, मखमलाबाद नाका) यांच्यावर मोक्कान्वये कारवाई केली़
मोक्कातील या संशयितांना पोलिसांनी १६ जुलै रोजी न्यायालयात हजर करून त्यांना पाठबळ तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती़ त्यानुसार न्यायालयाने या आठ संशयितांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ या कालावधीत पोलिसांनी परदेशी गँगला मदत करणाऱ्या राजकीय नेत्यांची माहिती जमा केली असून त्यानुसार सर्वांची गुप्त चौकशी सुरू आहे़ या चौकशीनुसार सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी महापालिका नगरसेवक पवन पवार, तसेच रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चा शहराध्यक्ष अर्जुन पगारे याची सुमारे पाच तास चौकशी केली़
मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या परदेशी गँगचे शहरातील मोठ्या राजकीय व्यक्तींसोबत संबंध असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले असून, या सर्वांचीच चौकशी केली जाणार आहे़ नगरसेवक पवार व पगारेच्या चौकशीमुळे शहरातील अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे़ तसेच या दोघांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे़ पोलिसांच्या या चौकशीमुळे राजकीय नेत्यांचे बुरखे फाडले जाणार असून, त्यांचे कृत्य जनतेसमोर येणार आहे. दरम्यान, गुन्हेगारांशी संबंध असल्याचे चौकशीअंत स्पष्ट झाल्यास अशांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Interrogation with a corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.