आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेची जय्यत तयारी
By Admin | Updated: May 5, 2015 00:57 IST2015-05-05T00:56:51+5:302015-05-05T00:57:15+5:30
आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेची जय्यत तयारी

आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेची जय्यत तयारी
नाशिक : येथे प्रथमच होत असलेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू असून, सोमवारी कोर्टाचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या ९ मेपासून या स्पर्धा सुरू होत असून, त्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नावाजलेले खेळाडू सहभागी होणार आहेत. सोमवारी झालेल्या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, मविप्रचे सभापती अॅड. नितीन ठाकरे, क्रीडा परिषद सदस्य नरेंद्र छाजेड, निवेकचे माजी अध्यक्ष रमेश वैश्य यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवेकचे अध्यक्ष संदीप सोनार होते. नाशिकमध्ये प्रथमच होत असलेल्या या स्पर्धांमुळे नाशिकच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात लॉन टेनिसला चालना मिळेल, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी व्यक्त केले. निवेकचे अध्यक्ष संदीप सोनार यांनी लॉन टेनिसचे प्रशिक्षक राकेश पाटील यांच्यामुळे नाशिकला यजमानपद मिळाल्याचे सांगत या स्पर्धांमुळे मुलींना टेनिस खेळासाठी प्रेरणा मिळेल, असे सांगितले. निवेकचे सचिव अरुण अहेर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संदीप गोयल यांनी केले. यावेळी मंगेश पाटणकर, राजकुमार जॉली, हेमंत कापडीया, राजेंद्र सूर्यवंशी, अशोक हेंबाडे, आशिष आरोरा, पंकज खत्री, आशिष महेशिका, प्रशांत साठे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.