इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
By Admin | Updated: August 13, 2014 00:44 IST2014-08-13T00:09:32+5:302014-08-13T00:44:29+5:30
जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणूक

इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत २१ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील इच्छुक जिल्हा परिषद सदस्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याचे चित्र आहे. कॉँग्रेसमधील काही इच्छुकांनी गटागटाने मोर्चेबांधणी केली असून, गटातील कोणा एकालाही उमेदवारी मिळाली तरी चालेल. मात्र उमेदवारी मिळालीच पाहिजे, असा लकडा पक्षश्रेष्ठींकडे लावण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे ग्रामविकासमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकारी व सदस्यांनी भेट घेतली असता त्यांना २१ सप्टेंबरला विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षाची मुदत संपुष्टात येत असून, निवडणुका होतील की नाही, याबाबत विचारणा केल्याचे कळते. त्यात ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी निवडणुका विहित कार्यकाळातच होतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्यांच्या आशा उंचावल्या असून, दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी गटागटाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
कॉँग्रेसकडून उपाध्यक्ष पदासाठी इगतपुरी, सिन्नर, नाशिक व बागलाणमधील इच्छुक सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, राष्ट्रवादीतूनही इगतपुरी, बागलाण, दिंडोरी व येवला तालुक्यांतील इच्छुकांनी अन्य पक्षांतील सदस्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)