दीडशे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या अधांतरी
By Admin | Updated: August 27, 2016 00:13 IST2016-08-27T00:13:37+5:302016-08-27T00:13:47+5:30
शिक्षण सभापती संतप्त : पालघर, कोल्हापूरच्या शिक्षकांची दांडी

दीडशे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या अधांतरी
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या सुमारे दीडशे शिक्षकांच्या बदल्या अधांतरी सापडल्या आहेत. शिक्षण सभापती किरण थोरे यांनी या बदल्यांचे आदेश तत्काळ रद्द करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
पालघर येथील ४३ व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ५० शिक्षकांना त्या त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाशिकला बदली होऊनही सोडलेले नाही. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेच्या २०० पैकी केवळ ६५ शिक्षकच नाशिकला हजर होऊ शकले आहेत. तिकडे बुधवारी मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांबाबतच्या बैठकीत नाशिक मधून अन्यत्र आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीबाबत चर्चा झाली. शिक्षण विभागाची आस्थापनेची जबाबदारी असलेले उपशिक्षणाधिकारी ए.जे. सोनवणे यांनी ११ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. ही माहिती समजताच संतप्त झालेल्या सभापती थोरे यांनी सोनवणे यांना बोलावून त्यांची कान उघडणी केल्याचे समजते.