गाळ्याची परस्पर विक्री
By Admin | Updated: February 5, 2017 22:32 IST2017-02-05T22:31:53+5:302017-02-05T22:32:13+5:30
गुन्हा दाखल : लाखोंचा घातला गंडा

गाळ्याची परस्पर विक्री
नाशिक : गंगापूर नाक्यावरील एका गाळ्याच्या व्यवहारापोटी पाच लाख रुपये घेऊन तो परस्पर दुसऱ्यास विक्री करून फसवणूक करणारे संशयित शरद पंडित पगार (रा. मयुरेश संकुल, पाइपलाइनरोड, गंगापूररोड) यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लालची-धोंडेगाव (ता. जि. नाशिक) येथील रहिवासी सुनील धर्मा कडाळे यांनी गंगापूर नाक्यावरील शर्मिला अपार्टमेंटमधील तीन नंबरच्या गाळ्याचा संशयित पगार यांच्याशी व्यवहार केला़ या व्यवहारापोटी कडाळे यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन उर्वरित २५ लाख रुपये खरेदीखताच्या वेळी देण्याचे दोघांमध्ये ठरले़ त्यानुसार पगार याने दुय्यम निबंधकांकडे २३ डिसेंबर २०१५ रोजी दस्ताची नोंदणीही केली़ यानंतर कडाळे यांनी वारंवार खरेदीखताबाबत विचारणा केली मात्र पगार टाळाटाळ करीत होते़ कडाळे यांना संशयित पगार यांच्या हेतूबाबत शंका आल्याने त्यांनी या गाळ्याच्या टायटल सर्च रिपोर्ट काढला़ त्यामध्ये पगार यांच्या दस्ताची ज्या दिवशी नोंदणी केली त्याचदिवशी दोन तासांनी हा गाळा शीतल कैलास जाधव यांना खरेदी दिला़ तसेच या गाळ्यावर १६ जुलै २००२ रोजी विश्वास बँकेला तारण देऊन १० लाख, ७ सप्टेंबर २००२ रोजी इंडीपेडन्ट को. आॅप. बँकेकडून ३ लाख २४ हजार रुपये, १५ सप्टेंबर २००३ रोजी राजलक्ष्मी अर्बन को बँकेकडून ५ लाख, ९ फेब्रुवारी २००४ रोजी बँक आॅफ बडोदाकडून ७ लाख रुपये, १३ एप्रिल २००४ रोजी इचलकरंजी जनता सहकारी बँकेकडून ५ लाख ५० हजार, म्हसरूळमधील गणपत शेळके यांच्याकडून १६ लाख ४ हजार रुपये तर शरद पगार यांच्याकडून पाच लाख रुपये कर्ज घेतल्याची माहिती कडाळे यांना मिळाली़ (प्रतिनिधी)