परस्पर पॅनलची निर्मिती
By Admin | Updated: October 23, 2016 00:10 IST2016-10-23T00:09:55+5:302016-10-23T00:10:28+5:30
इच्छुकांकडून प्रचारास सुरुवात : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उपक्रम

परस्पर पॅनलची निर्मिती
नाशिक : महापालिका निवडणुकीला सुमारे चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आणि अद्याप राजकीय पक्षस्तरावर युती -आघाडीचे चित्र स्पष्ट झालेले नसताना इच्छुकांनी परस्पर आपापल्या प्रभागात पॅनलची निर्मिती करत एकत्रितरीत्या प्रचारास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पॅनलमार्फतच एकत्रितरीत्या विविध उपक्रमांचेही आयोजन केले जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रभागातील चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीत यंदा चार सदस्यीय प्रभागरचना आहे. ३१ पैकी २९ प्रभागात चार सदस्य, तर दोन प्रभागांमध्ये तीन सदस्य असणार आहेत. चार सदस्यीय रचनेत आपल्या सोबत कोण-कोण असेल, कोणाला सोबत घेतले तर निवडणूक सोपी जाईल, कोणत्या उमेदवाराचा कोणत्या भागात मतसंख्या वाढण्यास मदत होईल या दृष्टीने अनेकांनी चाचपणी सुरू केली आहे, तर काही इच्छुक उमेदवारांनी पक्षपातळीवर घोषणा होण्यापूर्वीच परस्पर पॅनल निर्मिती करत आपणच पक्षामार्फत निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे दर्शविले आहे. काही प्रभागात तिघांनी, तर काही प्रभागात चौघांनी एकत्र येत पोस्टरबाजीही चालविली आहे.
सध्या दिवाळीचा माहौल असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी काही इच्छुकांनी एकत्रितपणे पोस्टरबाजी करत विविध उपक्रमांचेही आयोजन केले आहे. संबंधित इच्छुकांनी परस्पर पॅनल जाहीर करत अप्रत्यक्षपणे प्रचाराला प्रारंभ केल्याने अन्य इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काहींनी तर याबाबत हरकत घेत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची तयारी चालविली आहे. (प्रतिनिधी)