नाशिक पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:21 IST2021-08-17T04:21:06+5:302021-08-17T04:21:06+5:30
नाशिक: नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस आहे तसेच आज सर्वांनी जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरून ...

नाशिक पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस
नाशिक: नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस आहे तसेच आज सर्वांनी जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरून कोरोनासारख्या विषाणूचा एकजुटीच्या भावनेने सामना करण्याचे आवाहन, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी केले आहे.
नाशिक रोडच्या विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते संपन्न झाले. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सरोज अहिरे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालिका अश्वती दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले की, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांनी जसे देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग बांधला होता. त्याप्रमाणे आज स्वातंत्र्यदिनी सर्वांना एकजूट व ऐक्यातून देशाला राज्याला, जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था देशात रोल मॉडेल ठरेल, अशा पद्धतीने विकसित करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
सर्व यंत्रणेच्या अहोरात्र मेहनतीने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. कोराेना काळात आपली आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर भर देऊन नवीन ऑपरेशन थिएटर्स, ऑक्सिजन प्लांट, सर्वसुविधांनी युक्त प्रयोगशाळा कमी कालावधीत पूर्ण करण्यात येत आहे. तसेच म्युकरमायकोसिससारख्या आजाराला प्रशासन व आरोग्य विभागाने प्रभावीपणे नियंत्रणात आणले असल्याचे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले.
--इन्फो--
भुजबळ म्हणाले...
१) अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यात १ हजार १६७ शिवभोजन केंद्रामार्फत ५ कोटी थाळी वाटपाचा टप्पा पार केला आहे.
२) आज स्वातंत्र्यदिनी ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राज्यभर सुरू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन पीक कर्ज, पीक विमा अशा योजनांचा लाभासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ॲपच्या आधारे स्वत: पीक पेरणीची माहिती तलाठ्याकडे पाठविता येणार आहे.
३) नाशिक विभागातील आत्महत्याग्रस्त पात्र शेतकरी कुटुंबीयांच्या वारसांना सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून उभारी योजनेच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे
४) कोरोनाकाळात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या २४ बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
५) संगोपन योजनेंतर्गत एकूण ५३१ बालकांना दरमहा अकराशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.
६) माझी वसुंधरा अभियांनांतर्गत विभाग, जिल्हा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या चारही गटांत नाशिक जिल्ह्यासह विभागाची कामगिरी राज्यात उत्कृष्ट राहिली आहे.
७) नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या गुन्हेगार सुधार योजनांमुळे गुन्हेगारांना रोजगारासोबत समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग मिळणार आहे