चार कोटींच्या विम्यासाठी त्याने रचला स्वत:च्याच मृत्यूचा बनाव!
By Admin | Updated: June 27, 2017 23:51 IST2017-06-27T23:12:55+5:302017-06-27T23:51:03+5:30
खुनाची उकल : चांदवड तालुक्यातील वाघ खुनाचा पर्दाफाश ; तीन संशयितांना अटक

चार कोटींच्या विम्यासाठी त्याने रचला स्वत:च्याच मृत्यूचा बनाव!
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि, 27 - अपघाती मृत्युनंतर मिळणाऱ्या विम्याच्या चार कोटी रुपयांसाठी एकाने तीन साथीदारांच्या मदतीने स्वत:च्या मृत्युचा बनाव रचला खरा; मात्र शवविच्छेदन अहवाल आणि चाणाक्ष ग्रामीण पोलिसांच्या तपासामुळे त्याचा हा बनाव उघडकीस आला आहे़ या चौघा संशयितांनी मृतदेहासाठी एका हॉटेल कर्मचाऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वररोडवरील अंबाई शिवारातील तोरंगण घाटात ठेवून अपघाताचा बनाव रचला होता़ ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील तीघा संशयितांना अटक केली असून प्रमुख संशयित फरार झाला आहे़
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जव्हार - त्र्यंबकेश्वर रोडवरील तोरंगण घाटात सरंक्षण भिंतीजवळ नऊ जून रोजी मृतदेह आढळून आला होता. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला होता़ तसेच या मृतदेहाच्या कपड्यांची तपासणी केल्यानंतर त्याच एचडीएफसी व महिंद्रा कोटक बँकेचे एटीएम कार्ड आणि लाईटबिल आढळून आले. तसेच एमएच १५ डीटी ८५३ क्र मांकाची सीबीझेड एक्स्ट्रीम दुचाकीही आढळून आली होती़ या कागदपत्रांवरून रामदास पुंडलिक वाघ (39, रा. तांगडी शिवार, ता. चांदवड) यांचा हा मृतदेह असल्याचे समोर आले़
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालात गळा आवळून तसेच डोक्यात, तोंडावर टणक हत्याराने वार केल्याने वाघ यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले व त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांगडी येथील रहिवासी रामदास वाघ यांची माहिती घेण्यास सुरु वात केली असता तो वादग्रस्त जमीनींची खरेदी विक्र ीचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आले़ तसेच गतवर्षी त्याने विविध कंपन्यांचा ४ कोटी रु पयांचे विमा काढल्याचेही समोर आले़
पोलिसांनी रामदास वाघचा मित्र सतीष खंडेराव गुरगुडे (३१) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता वाघ याने विम्याच्या चार कोटी रुपयांसाठी स्वत:च्या अपघाताची मृत्युचा बनाव रचल्याची माहिती दिली़ या प्रकरणाचा सखोल तपासानंतर श्रावण वेडू वांजुळे (५०) व सागर श्रावण वांजुळे (२०, दोघे रा. शिरूर तांगडी) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत मुख्य संशियत रामदास वाघ व तिघांनी तांगडी शिवारातील महाराणा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अण्णा नावाच्या परप्रांतिय कर्मचाऱ्याचा खून करून त्याचा मृतदेहावरून गाडीचे चाक चालवून चेहरा विद्रुप केला. त्यानंतर त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वर येथे टाकून फरार झाले़ याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी वांजुळे पिता पुत्रांसह सतीष गुरगुडे यास अटक केली आहे. तर मुख्य आरोपी रामदास वाघ हा फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
खूनापूर्वी अण्णास चांगले जेवन
महाराणा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अण्णास संशयितांनी खूनाच्या दोन दिवस अगोदरच हॉटेलमधून गोड-गोड बोलून सोबत नेले. यानंतर सागर वांजुळे याने या अण्णास दोन दिवस चांदवड देवळा रोडवरील एका हॉटेलमध्ये तसेच देवळा तालुक्यातील निताणे येथील नातेवाईकाच्या घरी ठेवले व दोन दिवस त्याचा पाहुणचारही केला. तर घटनेच्या दिवशी ९ जून रोजी अण्णाला रामदास वाघचे कपडे घालण्यास दिले. यानंतर रामदासच्या कारमध्ये बसवून त्र्यंबकेश्वर जव्हार रोडवरील आंबाई घाटात घेऊन नेले. या ठिकाणी गुंगीचे औषध व दारु पाजून कारमधील सीटबेल्टनेच अण्णाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर अण्णाच्या कपड्यांमध्ये एटीएम कार्ड व लाईट बील ठेवून मृतदेहावरून कार चालवून चेहरा विद्रुप केला. तसेच तो मृतदेह रामदास वाघ याचाच असल्याचा बनाव रचला. दरम्यान, खून झालेला अण्णा हा तामीळनाडूतील सालेम येथील मुबारक चॉंद पाशा असल्याचेही तपासात समोर आले आहे.
विम्याच्या रकमेत प्रत्येकाचा हिस्सा
रामदास वाघ याने चार कोटी रुपये विम्याची रक्कम मिळाल्यानंतर प्रत्येकाला त्यांचा हिस्सा देण्याचे कबुल केले होते़ साथीदार सतीष गुरगुडे याला विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी ५० लाख रुपये दिले जाणार होते़ तर सतीषनेच घटनेच्या दिवशी रामदास वाघ याची दुचाकी श्रावण वांजुळे याच्याकडे पोहचवली. याबरोबरच श्रावण वांजुळे याला खूनाच्या गुन्ह्यात मदतीसाठी रामदास वाघ हा विम्यातील आणखी काही रक्कम तसेच मुलीच्या लग्नासाठी उसनवार घेतलेले तीन लाख रु पयेम् माफ तसेच जेसीबीचे कर्जही फेडणार होता. तर सागर वांजुळे यास कटाची माहिती असूनही त्याने अण्णा उर्फ मुबारक पाशा यास दोन दिवस सांभाळून पाहूणचार केल्याबद्दल विम्यातील काही रक्कम मिळणार होती़
यांच्यामुळे झाली गुन्ह्याची उकल
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मिच्छंद्र रणमाळे, सहायक उपनिरीक्षक अनिल धुमसे, चंद्रभान जाधव, राजू दिवटे, भगवान निकम, बंडू ठाकरे, दिलीप घुले, प्रकाश चव्हाणके, वसंत साबळे, पुंडलिक राऊत, संजय गोसावी, पोलीस नाईक जालिंदर खराटे, सुशांत मरकड, अमोल घुगे, हेमंत गिलबीले, सचीन पिंगळ, संदीप लगड, मंगेश गोसावी, रवी टर्ले, प्रदीप बिहरम, विश्वनाथ काकड, किरण काकड, चालक समाधान बोराडे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला़