जळीत प्रकरणी सखोल तपासाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:37 PM2020-02-17T23:37:34+5:302020-02-18T00:15:36+5:30

लासलगाव येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी (दि. १५) घडलेल्या महिला जळीत प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयानेही घेतले असून, सदर घटना सार्वजनिक ठिकाणी घडलेली असल्याने मुख्य संशयित आरोपीवर गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३२६ लावतानाच सखोल तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, मुख्य संशयित आरोपी रामेश्वर ऊर्फ बाला मधुकर भागवत यास निफाड न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Instructions for a thorough investigation into the burning case | जळीत प्रकरणी सखोल तपासाचे निर्देश

जळीत प्रकरणी सखोल तपासाचे निर्देश

googlenewsNext
ठळक मुद्देन्यायालयही गंभीर : मुख्य संशयितास पोलीस कोठडी

लासलगाव : येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी (दि. १५) घडलेल्या महिला जळीत प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयानेही घेतले असून, सदर घटना सार्वजनिक ठिकाणी घडलेली असल्याने मुख्य संशयित आरोपीवर गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३२६ लावतानाच सखोल तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, मुख्य संशयित आरोपी रामेश्वर ऊर्फ बाला मधुकर भागवत यास निफाड न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लासलगाव बसस्थानकात घडलेल्या महिला जळीत प्रकरणी रविवारी (दि.१६) पहाटे येवल्यातून ताब्यात घेतलेल्या रामेश्वर भागवत यास पोलिसांनी सोमवारी (दि.१७) निफाड येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस. बी. काळे यांच्यासमोर हजर केले. यावेळी लासलगाव पोलिसांनी न्यायालयात रिमांड अहवाल सादर केला. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली, तर सरकारी वकील अ‍ॅड. राजीव तडवी यांनी पीडितेची प्रकृती चिंताजनक असून संशयिताकडून लासलगाव तसेच विविध ठिकाणी तपास करणे आवश्यक असल्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवितांना सांगितले, सदर घटना ही सार्वजनिक ठिकाणी घडलेली आहे.
पोलिसांनी लावलेली कलमे ही जामीनपात्र आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पीडितेने जबाब दिलेला असला तरी तपास यंत्रणेने मात्र त्रयस्थ भूमिकेतून सखोल तपास करावा आणि गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादंवि कलम ३२६ लावण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने न्यायालयाने भागवत यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी सोमवारी सकाळी निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी लासलगाव येथील पोलीस कार्यालयात तपासाचा आढावा घेत पोलिसांना काही सूचना केल्या.

काय आहे कलम ३२६?
महिला जळीत प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी रामेश्वर भागवत याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३३८, २८५ आणि १८८ लावले आहे. यात इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने जबर दुखापत पोचविणे यासाठी कलम ३३८, आग अगर ज्वालाग्रही पदार्थ यांच्याबाबत हयगयीचे वर्तन यासाठी कलम २८५, तर लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे यासाठी कलम १८८ लावण्यात आले आहे. कलम ३३८ अन्वये जास्तीत जास्त दोन वर्षांपर्यंतची शिक्षा, कलम २८५ अन्वये सहा महिन्यांपर्यंत कारावास तर कलम १८८ अन्वये एक ते जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. आता त्यात गंभीर दुखापत केल्याप्रकरणी कलम ३२६ लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.

Web Title: Instructions for a thorough investigation into the burning case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.