शिक्षण खात्याच्या आदेशाने पर्यटनावर घाला
By Admin | Updated: February 6, 2016 23:00 IST2016-02-06T22:58:19+5:302016-02-06T23:00:59+5:30
अजब : दुर्घटना घडली म्हणून किनारे वर्ज्य करणे अव्यवहार्य; सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी

शिक्षण खात्याच्या आदेशाने पर्यटनावर घाला
समुद्रात बुडून चौदा शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने शिक्षण विभागाने समुद्रकिनारे आणि उंच ठिकाणी सहलींना मनाई करणारे आदेश जारी केले आहेत. शासनाची ही अतिदक्षता मात्र पर्यटक आणि पर्यटन व्यवसायाच्या मुळावर उठणार असून, कोकणचे पर्यटन अडचणीत येणार आहे. हे आदेश म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती असून, उद्या सहलीच्या बसला अपघात घडला, तर सहलीच बंद करणार काय? असा प्रश्न पर्यटन व्यावसायिकांनी केला आहे.
पुण्याच्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थी पाण्याचा अंदाज न आल्याने मुरूड येथील सागरात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. प्रत्यक्षात काय घडले, याची चौकशी न करताच शिक्षण खात्याने हा निर्णय घेतल्याने त्याचे परिणाम पर्यटनावर होण्याची शक्यता आहे. पर्यटन स्थळांच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांना रोजगार मिळतो, तसेच समुद्र किनाऱ्यावर म्हणजे बीचच्या व्यवसायावर ज्यांचा उदरनिर्वाह आहे, त्यांच्यावर संकट येणार आहे, परंतु समुद्र किनाऱ्याचे निसर्गसौंदर्य पाहणाऱ्या पर्यटकांना बंदी करण्यात आल्याने त्यांच्या हक्कावर गदा आली आहे. कोकण, गोवा अशा ठिकाणी महाविद्यालये आणि शाळांच्या सहली नेणारे अडचणीत येणार आहेत. राज्य शासनाने पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचे सोडून निर्बंध घालण्याचे तरी थांबवावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. समुद्रकिनारा सोडाच, परंतु एखाद्या राजवाड्याला भेट देण्यासाठी विद्यार्थी गेले आणि राजवाड्याची भिंत पडली तर दुर्घटना झाली म्हणून राजवाडे पाहण्यास शासन मनाई करणार काय की एखाद्या सहलीच्या बसला अपघात झाला म्हणून बसने सहल नेण्यास बंदी करणार, असे प्रश्न पर्यटन व्यावसायिकांनी केले आहेत.