महिनाभरात हायड्रोलिक टेस्ट पूर्ण करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST2020-12-30T04:18:28+5:302020-12-30T04:18:28+5:30
सिन्नर : शहरासाठी कडवा धरणातून कोट्यवधी रुपये खर्चून महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना राबविली. जुन्या योजनेचेही पाणी सुरू आहे. दोन्ही मिळून ...

महिनाभरात हायड्रोलिक टेस्ट पूर्ण करण्याच्या सूचना
सिन्नर : शहरासाठी कडवा धरणातून कोट्यवधी रुपये खर्चून महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना राबविली. जुन्या योजनेचेही पाणी सुरू आहे. दोन्ही मिळून दररोज एक कोटी लीटर पाणी मिळते. तरीही शहरवासीयांना चार आणि पाच दिवसांनी पाणी मिळत असेल, तर एवढ्या मोठ्या योजनेचा फायदा काय? असा प्रश्न उपस्थित करीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी कंत्राटदाराला ४५० एचपीचे दोन्ही पंप जनरेटवर चालवून महिनाभरात हायड्रोलिक टेस्ट पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
कडवा धरणातून योजना कार्यान्वित झाल्यानंतरही शहराच्या काही भागात चार तर काही भागांत पाचव्या दिवशी पाणी येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, कोकाटे यांनी योजनेची आढावा नगरपरिषदेच्या बैठक बोलावली होती. मुख्याधिकारी संजय केदार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, कंत्राटदार राजाभाऊ घुले यांच्या उपस्थित नगरपालिका सभागृहात बैठक पार पडली.
कोकाटे यांनी सुरुवातीलाच कडवा योजना, दारणा नदीतील जुनी योजना याद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा हिशेब विचारला. त्यात कडवातून ६० लाख तर जुन्या योजनेद्वारे ५८ लाख लीटर पाणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर दररोज एक कोटी लीटरपेक्षा जास्त पाणी येऊनही केवळ नियोजनाअभावी ७०-७५ हजार लोकसंख्येच्या शहरात पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे अधोरेखित झाले. त्यातल्या त्यात कडवा योजना नवीन असूनही, आठवडा-दोन आठवड्याला दोन तीनदा पाइपलाइन फुटत असल्याचीही बाब नगरसेवकांनी निदर्शनास आणली. विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, नगरसेवक मल्लू पाबळे, सुहास गोजरे, संतोष शिंदे, नगरसेविका शितल कानडी, वासंती देशमुख, प्रीती वायचळे, निरुपमा शिंदे, मालती भोळे, अलका बोडके, माजी नगरसेवक मेहमूद दारुवाला, किरण मुत्रक, पी. आर. वारुंगसे, अनिल वराडे, संतोष तेलंग यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
-------------------------
रहिवाशांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
आमदार कोकाटे यांनी हायड्रोलिक टेस्टचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर कंत्राटदार घुले यांनी हायड्रोलिक टेस्ट झाल्याचे सांगून मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, नपाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अभियंता हेमलता दसरे यांनी केवळ १३ किमीची हायड्रोलिक टेस्ट झाली असून, ५३ किमीची बाकी असल्याचे सांगितले. त्यामुळे कोकाटे यांनी कंत्राटदाराला जनरेटर भाड्याने घेऊन दोन्ही पंप एकाच वेळी सुरू करून हायड्रोलिक टेस्ट पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. त्याशिवाय योजनेतील त्रुटी दूर होणार नसल्याचे ते म्हणाले. कंत्राटदाराने टेस्ट पूर्ण करण्याला सहमती दर्शविली. वाढीव हद्दीतील उपनगरांमध्ये नगरपालिकेच्या पाइपलाइन टाकलेल्या नसल्याने तेथील रहिवाशांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यावर दरमहा दोन लाख रुपये खर्च येतो. नपा फंडातून वेगवेगळ्या भागात रस्ते करण्यापेक्षा या भागात पाइपलाइन टाकल्या तर नगरपालिकेचा दरमहा दोन लाख रुपये खर्च वाचेल, असे आमदार कोकाटे यांनी सूचित केले. त्यावर मुख्याधिकारी केदार यांनी पंधराव्या वित्त आयोगातून पाइपलाइन टाकण्याचे संकेत दिले.
----------------------
सिन्नर नगरपरिषदेत कडवा पाणी योजनेचा आढावा घेताना आमदार माणिकराव कोकाटे. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, मुख्याधिकारी संजय केदार. (२९ सिन्नर २)