सूनबार्इंऐवजी सासरेच झाले सभापती
By Admin | Updated: April 8, 2017 23:13 IST2017-04-08T23:13:09+5:302017-04-08T23:13:37+5:30
र्यंबकेश्वर : सभापती ज्योती राऊत यांना बाजूला ठेवून त्यांच्या सासऱ्यांनीच बैठकीची सूत्रे हाती घेऊन अधिकाऱ्यांना जेरीस आणल्याची चर्चा सुरू होती.

सूनबार्इंऐवजी सासरेच झाले सभापती
त्र्यंबकेश्वर : सभापती ज्योती राऊत यांना बाजूला ठेवून त्यांच्या सासऱ्यांनीच बैठकीची सूत्रे हाती घेऊन अधिकाऱ्यांना जेरीस आणल्याचा अजब प्रकार त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या पहिल्याच आढावा बैठकीत पाहावयास मिळाल्याने दिवसभर याबाबत पंचायत समिती वर्तुळात चर्चा सुरू होती.
त्र्यंबक पंचायत समितीची गुरुवारी सभापती ज्योती राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपसभापती रवींद्र भोये, सदस्य देवराम मौळे, मनाबाई भस्मा, मोतीराम दिवे, अलका झोले, जि. प. सदस्य रु पांजली माळेकर, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे आदि उपस्थित होते. सभागृहात सदस्यांच्या रांगेतच एक गृहस्थ बसलेले असल्याने प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी बुचकळ्यात पडले.
याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता ते गृहस्थ सभापती ज्योती राऊत यांचे सासरे लक्ष्मण राऊत असल्याचा खुलासा त्यांनी केला. पंचायत समितीशी कोणताही संबंध नसताना लक्ष्मण राऊत यांनी सुरुवातीपासूनच थेट चर्चेत भाग घेण्यास सुरुवात केल्याने प्रश्नांची उत्तरे नेमकी कुणाला द्यायची असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला. सभेपुढे येणाऱ्या प्रत्येक विषयाच्या चर्चेत सहभागी होऊन लक्ष्मण राऊत यांनी जणू काही आपणच सभापती असल्याच्या आविर्भावात संपूर्ण सभेची सूत्रेच आपल्या हाती घेतल्याचे दृश्य सभागृहात दिसत होते.
विशेष म्हणजे सासरे बोलत असताना सूनबाई चक्क गप्प बसून असल्याचे दिसले. याप्रकारामुळे अधिकारी मात्र त्रस्त झाले. काहीवेळा विभागाशी संबंधित नसलेल्या बाबींविषयीही अधिकाऱ्यांना विचारणा होत असल्याने अधिकारी त्रस्त झाले. (वार्ताहर)