नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना

By Admin | Updated: August 12, 2016 22:45 IST2016-08-12T22:44:42+5:302016-08-12T22:45:29+5:30

जे.पी. गावित : कळवण येथे आढावा बैठक; गडावरील रस्त्याच्या कामाला प्रारंभ

Instant notifications for losses | नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना

नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना

 कळवण : तालुक्यात अतिवृष्टीने बाधित होऊन अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदार कार्यालयात आमदार जे. पी. गावित यांनी आढावा बैठक घेऊन सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणी दौऱ्यात गावित यांनी नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
तालुक्यात मागील आठ दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने रस्ते, कालवे तसेच मका, भात, टमाटे, मिरची आदि शेतपिकांचे बरेच नुकसान झाले. याबाबत आमदार गावित यांनी आढावा बैठक घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यात अतिवृष्टीने ज्यांची लहान-मोठी जनावरे मयत झालेली आहेत त्यांना तीन ते चार दिवसात मदत केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार कैलास चावडे यांनी यावेळी दिले. घरांची पडझड झाली असेल तर त्यांनाही १३ मे २०१५च्या शासन निर्णयानुसार त्वरित मदत केली जाणार असल्याचे यावेळी तहसीलदार चावडे यांनी सांगितले.
शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले असल्यास कृषी व तहसील विभागामार्फत शासन निर्णयानुसार पंचनामे करणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. पंचनामे करण्यास तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्यास त्याबद्दल त्वरित तहसील कार्यालयात तक्रार करण्याच्या सूचना यावेळी आमदार गावित यांनी दिल्या. भौती ते पुनंदनगर दरम्यानचा रस्ता खचून गेल्याने त्या रस्त्यास तीन-चार फुटांची खटकी पडल्याने वाहतूक बंद आहे. डोंगराचा भाग असल्याने मुरूम वाहून जात असून, बऱ्याच ठिकाणी रस्ते खचले गेल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. पाहणी दौऱ्यात तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रवींद्र चव्हाण, कृषी सहायक किशोर भरते, वनविभागाचे आढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र सपकाळे, हेमंत पाटील, भरत शिंदे, संतोष देशमुख, सावळीराम पवार, बाळासाहेब गांगुर्डे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Instant notifications for losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.