महापूराचा फटका मोठ्या प्रमाणात दोन्ही काठांवरील जुने नाशिक व पंचवटी भागाला बसला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात चिखलगाळाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागाची गमे यांनी मनपाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी क रत तत्काळ मदतकार्य युध्दपातळीवर राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे.
मनपा आयुक्त गमे यांच्याकडून गोदाकाठाची पाहणी; युध्दपातळीवर मदतकार्याचे आदेश
ठळक मुद्देमदतकार्य युध्दपातळीवर राबविण्याचे आदेश पंधरवड्यात जुन्या नाशकात मोठ्या संख्येने वाडे कोसळले कचरा साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.
नाशिक : महापूर ओसरल्यानंतर गोदाकाठावर झालेल्या दैनावस्थेची पाहणी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.६) केली. गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे गोदावरीचा रौद्रावतारही आता नाहीसा झाला आहे; मात्र महापूराचा फटका मोठ्या प्रमाणात दोन्ही काठांवरील जुने नाशिक व पंचवटी भागाला बसला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात चिखलगाळाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागाची गमे यांनी मनपाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी करत तत्काळ मदतकार्य युध्दपातळीवर राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे.
महापूर ओसरल्यानंतर गोदाकाठालगत असलेला रामकुंड, मालेगावस्टॅन्ड, सरदार चौक, मालवीय चौक, शनि चौक, अमरधाम, नानावली, जुना कुंभारवाडा, काजी गढी तसेच सराफ बाजार, भांडी बाजार, नेहरू चौक, नावदरवाजा, बालाजी कोट, उत्कर्षनगर, आनंदवली, गंगापूररोडचा काही परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तसेच महापूरात वाहून आलेला पाणवेली, झाडांच्या फांद्यांसह अन्यप्रकारचा कचरा साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पूर ओसरल्यानंतरची स्वच्छतेची कामे प्राधान्याने आवश्यक ती सर्व साधनसामुग्री उपलब्ध करून देत कर्मचाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश प्रशासकीय विभागप्रमुखांना गमे यांनी पाहणी दौ-यात दिले.