विद्युत निरीक्षक कार्यालयातर्फे प्रबोधन
By Admin | Updated: January 17, 2017 00:26 IST2017-01-17T00:25:51+5:302017-01-17T00:26:07+5:30
सुरक्षा सप्ताह : शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

विद्युत निरीक्षक कार्यालयातर्फे प्रबोधन
नाशिक : शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने नाशिकच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या वतीने ११ ते १७ जानेवारी या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताहअंतर्गत नागरिकांमध्ये वीज सुरक्षेबाबत जनजागृती केली.
विद्युत निरीक्षक एम. बी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत निरीक्षक कार्यालयाने शहरातील शाळा तसेच कारखान्यांमध्ये नागरिकांना वीज सुरक्षा आणि विजेची उपकरणे याबाबत माहिती दिली. वीज ही आपल्या जीवनातील दैनंदिन गरज असून, आपण विजेच्या उपकरणावर अवलंबून आहोत. त्याबरोबरच विद्युत अपघाताने जीवितहानी होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे विद्युत उपकरणे सुरक्षितपणे कशी हाताळावीत, कुठल्या दर्जाची उपकरणे असावीत याबरोबरच नागरिकांनी विद्युत नियमांचे पालन करावे यासाठी केंद्रीय विद्युत मंडळाच्या मार्गदर्शनानुसार शहरात विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या वतीने जनजागृती करण्यात आली.
शहरातील सुमारे नऊ शाळा तसेच अनेक कारखान्यांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच ‘नाशिक रन’च्या निमित्ताने महात्मानगर मैदानावर जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत विद्युत निरीक्षक एस. बी. महाजन यांच्यासमवेत सहायक विद्युत निरीक्षक आर. एस. गिते, शाखा अभियंता व्ही. के. देशमुख, ए. पी. नारखेडे, पी. जी. विसपुते, जे. यू. गढवाल, सहायक अभियंता जी. ई. पाटील, व्ही. एच. गोसावी, शाखा अभियंता एन. व्ही. बागुल यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)