आखाड्यांकडून जादा प्लॉट्सचा आग्रह
By Admin | Updated: July 12, 2015 23:45 IST2015-07-12T23:44:27+5:302015-07-12T23:45:16+5:30
साधुग्राम : महंत ग्यानदास यांच्या मागणीने प्रशासनाची कोंडी

आखाड्यांकडून जादा प्लॉट्सचा आग्रह
नाशिक : दोन दिवसांपूर्वी साधुग्राममधील चारशे प्लॉट्स विविध संस्थांना देण्यास तयार असलेल्या महंत ग्यानदास यांनी घूमजाव करीत वाढीव जागेची मागणी केल्याने प्रशासनाची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. प्रशासनाने यापूर्वीच काही संस्थांना जागावाटप करून टाकल्याने आता साधूंच्या आखाड्यांना वाढीव जागा कशी उपलब्ध करून द्यावी, असा पेच अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
तपोवनातील साधुग्राममध्ये सुमारे सतराशे प्लॉट्स असून, त्यातील तेराशे प्लॉट्स साधू-महंतांच्या आखाड्यांना, तर उर्वरित चारशे प्लॉट्सचे विविध धार्मिक, सामाजिक संस्थांना वितरण केले जाणार होते. आखाड्यांच्या जागावाटपाचे सर्वाधिकार प्रशासनाने महंत ग्यानदास यांच्याकडे दिले होते; मात्र या प्रक्रियेवर अन्य काही महंतांनी नाराजी व्यक्त केली होती. जगद्गुरू हंसदेवाचार्य यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटवला, तेव्हा ग्यानदास यांनी तेराशे प्लॉट्सचे वाटप आपल्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे जाहीर केले होते. तर चारशे प्लॉट्स प्रशासन विविध संस्थांना वाटप करणार असल्याचेही म्हटले होते. त्यानुसार तिन्ही अनी आखाड्यांच्या सचिवांकडे जागावाटपाची जबाबदारी देण्यात आली होती व कामही सुरू झाले होते.