नांदुरशिंगोटेच्या ग्रामसेवकाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 01:59 IST2021-07-30T01:58:35+5:302021-07-30T01:59:28+5:30
सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे ग्रामपंचायतीत ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत सात लाभेच्छुकांना मयत दाखविल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने गंभीर दखल घेतली असून, गटविकास अधिकाऱ्यांना या घटनेची चाैकशी करून संबंधित ग्रामसेवकाचा निलंबनाचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नांदुरशिंगोटेच्या ग्रामसेवकाची चौकशी
नाशिक : सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे ग्रामपंचायतीत ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत सात लाभेच्छुकांना मयत दाखविल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने गंभीर दखल घेतली असून, गटविकास अधिकाऱ्यांना या घटनेची चाैकशी करून संबंधित ग्रामसेवकाचा निलंबनाचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चार दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत व्यक्तिगत शौचालयाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची यादी नांदुरशिंगोटे ग्रामपंचायतीने तयार करून नोटीस फलकावर लावली असता, त्यात सात व्यक्तींची नावे नसल्याचे आढळून आले. ज्यांची नावे नव्हती, त्यांनी विचारणा केली असता ते मयत झाल्याचे सांगण्यात आले. जिवंत व्यक्तींना मयत दाखविल्याची बाब उघडकीस येताच, ग्रामपंंचायतीच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांतून वृत्त येताच त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सिन्नरच्या गटविकास अधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करून ग्रामसेवकाच्या निलंबनाचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचा तसेच विभागीय चौकशी करण्याचा प्रस्तावही सादर करण्याचे आदेश दिले आहेत.