चौकशी : दळवट येथील विद्यार्थी आत्महत्त्या प्रकरण

By Admin | Updated: January 2, 2015 00:25 IST2015-01-02T00:24:34+5:302015-01-02T00:25:55+5:30

मुख्याध्यापकासह अधीक्षक ताब्यात

Inquiries: Student Suicides Case at Dalpat | चौकशी : दळवट येथील विद्यार्थी आत्महत्त्या प्रकरण

चौकशी : दळवट येथील विद्यार्थी आत्महत्त्या प्रकरण

पाळे खुर्द / कनाशी : तालुक्यातील दळवट येथील विद्यार्थी आत्महत्त्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून, मयत विद्यार्थ्याच्या नातेवाइकांची पोलीस, महसूल व आदिवासी विकास खात्याच्या अधिकारी व शिक्षकांशी दिवसभर वाद झाल्याने आश्रमशाळेला छावणीचे स्वरूप आले होते. या प्रकरणाची माहिती घेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मध्यस्थी करीत या वादावर पडदा टाकत या प्रकरणाची कसून व निपक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी भूमिकाही स्पष्ट केली.
कळवण तालुक्यात दळवट येथे आदिवासी विकास विभागाची पहिली ते बारावीपर्यंत शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळा आहे. ह्या आश्रमशाळेत शिवभांडणे येथील योगेश मधुकर बागुल हा विज्ञान शाखेत बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्त्या केली. आपल्या शाळेतील विद्यार्थ्याने गळफास घेतला आहे हे समजूनही शाळेतील शिक्षकांनी शाळा सुरू ठेवली तर शालेय व्यवस्थापन समितीही शाळेकडे फिरकलीच नाही. त्यामुळे हा घातपातच असल्याचा सूर पालकांनी लावला. याबाबत कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही काम करू शकतो, असे प्रभारी प्रांताधिकारी संजय बागडे, पोलीस उपअधीक्षक सचिन गुंजाळ, तहसीलदार अनिल पुरे, प्रकल्प अधिकारी अविनाश चव्हाण आदिंनी संबंधिताना सांगितले. मात्र मयताचे नातेवाईक ऐकून घेण्यास तयार होत नव्हते. यामध्येच पोलिसांशी त्यांची झटापट झाल्याने वातावरण चिघळले. घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली. दरम्यान, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी या ठिकाणी हजेरी लावत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत समन्वय साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या समवेत आदिवासी नेते एन.डी. गावित, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, काशीनाथ गायकवाड आदि उपस्थित होते. दरम्यान, आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकाणी अभोणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चौकशीसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक डी. एन. निकम, अधीक्षक मंगेश खिराडकर यांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्याध्यापक सध्या दवाखान्यात दाखल आहेत. (वार्ताहर)

Web Title: Inquiries: Student Suicides Case at Dalpat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.