‘सीआर’ प्रकरणाची चौकशी व्हावी
By Admin | Updated: July 19, 2014 01:05 IST2014-07-19T00:05:55+5:302014-07-19T01:05:09+5:30
दिरंगाई : नगरसेवक ढगे यांच्यासह शिष्टमंडळाचे निवेदन

‘सीआर’ प्रकरणाची चौकशी व्हावी
नाशिक : कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल दरवर्षी लिहिणे अपेक्षित असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. या प्रकरणी शासनाच्या आदेशाला डावलून शासकीय कार्यालयांमध्ये मनमानी सुरू असल्याने या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक शैलेश ढगे यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल नोंदविण्याची जबाबदारी असणारे अधिकारी दरवर्षी अहवाल नोंद करीत नसल्याने कर्मचाऱ्यांना पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती तसेच आश्वासित योजनांपासून वंचित रहावे लागते. शिवाय अहवाल नोंदविण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची बदली झाली तर कर्मचाऱ्याला त्याच्या बदलीच्या ठिकाणी जाऊन विनवणी करावी लागते. यातून अनेक अनिष्ट आर्थिक तडजोडी केल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
गोपनीय अहवाल नोंदणीबाबत शासनाने वेळोवेळी आदेश काढलेले आहेत. तसेच गोपनीय अहवाल नोंदणीचे शिबिरे घेण्याची सुचविले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांची हेळसांड सुरूच आहे. कर्मचाऱ्यांना कुणीही वाली नसल्याने त्यांचे अर्थिक नुकसान होत असल्याचे नगरसेवक ढगे यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी तसेच जे अधिकारी ऐकमेकांना सांभाळून घेतात त्यांचीही चौकशी करून या कामात पारदर्शकता आणावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पूर्ववसन उपआयुक्त टी.एम. बागुल यांना निवेदन सादर करताना नगरसेवक शैलेश ढगे, नितीन विरवार, चेतन वाघ, चंद्रशेखर सरोदे, प्रमोद फडोळ, दिनेश दास, आनंद कनोजिया, गणेश गडाख, राजेंद्र देशमुख आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)