हल्लेखोरांची शोध मोहीम सुरूज
By Admin | Updated: October 9, 2015 23:09 IST2015-10-09T23:08:36+5:302015-10-09T23:09:04+5:30
खमी जोंधळे यांची प्रकृती स्थिर

हल्लेखोरांची शोध मोहीम सुरूज
पंचवटी : दुकान बंद करून घराकडे परतणाऱ्या बी-बियाणे व्यापाऱ्यावर हल्ला चढवून गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमाराला धात्रकफाटा परिसरात घडली होती. या घटनेतील संशयितांच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या नीलेश जोंधळे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, धात्रकफाटा परिसरातील एका हॉटेलबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून, त्या कॅमेऱ्यात संशयित दिसतात का याचे फुटेज तपासणी तसेच जोंधळे यांच्या भ्रमणध्वनीवर आलेले कॉल्स रेकॉर्ड तपासणीचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. धात्रकफाट्यावरील योगेश्वर अपार्टमेंट येथे राहणाऱ्या जोंधळे यांचे धात्रकफाटा परिसरात जोंधळे कृषी उद्योग नावाचे दुकान असून, गुरुवारी रात्री ते दुकान बंद करून घराकडे आले असता इमारतीच्या वाहनतळात दोघा संशयितांनी त्यांच्याशी झटापट करून गोळीबार केला होता या घटनेत जखमी झालेल्या जोंधळे यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या पत्नी व इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी खाली धाव घेतली असता जोंधळे जखमी झाल्याचे दिसून आले होते त्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांना उपचारार्थ जवळच्या अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने इमारतीची तपासणी केली असता एका दुचाकीच्या चाकाजवळ काडतूस मिळाले होते. जोंधळे यांच्यावर पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरूनच हा गोळीबार झाला असावा, अशी शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)