कृषी संजीवनी योजनेला कळवण विभागात सुरुवात
By Admin | Updated: July 25, 2014 00:27 IST2014-07-24T22:57:04+5:302014-07-25T00:27:24+5:30
ग्राहकांकडे ३६ कोटी दहा लाख थकबाकी

कृषी संजीवनी योजनेला कळवण विभागात सुरुवात
कळवण : कृषी ग्राहकांवरील वीज देयकाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्याकरिता कृषी संजीवनी योजना सुरु केली असून, ही योजना कळवण विभागात लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कळवण विभागातील शेतकरी बांधवानी घ्यावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे कळवण उपविभागाचे सहाय्यक अभियंता किरण जाधव यांनी केले आहे.
कळवण व देवळा तालुक्यातील २५ हजारांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार असला तरी या वर्षी शेतकरी वर्गावर आलेल्या अस्मानी-सुलतानी संकटामुळे व दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने या योजनेला शेतकरी वर्गाकङून कितपत प्रतिसाद मिळतो यावर योजनेचे कळवण विभागात भवितव्य अवलंबून आहे.
योजनेमुळे विभागातील लाखो रुपयांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. योजनेअंतर्गत कृषी ग्राहकांनी त्यांच्या ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या थकबाकीतील मूळ रकमेची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरल्यास उरलेली ५० टक्के मूळ रक्कम व थकीत व्याज व दंड माफ होणार आहे. तीन हप्त्यांत शेतकरी थकबाकीची रक्कम भरू शकणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता वीस टक्के ३१ आॅगस्टपर्यंत दुसरा हप्ता कमीत कमी २० टक्के ३० सप्टेंबरपर्यंत व उरलेली रक्कम ३१ आॅक्टोंबरपर्यंत भरायची आहे. कळवण व देवळा तालुक्यांतील कृषी ग्राहक २५ हजार ८४४ असून, त्यांच्याकडील थकबाकी ३६ कोटी दहा लाख रुपये आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळवण विभागाचे महावितरणचे कार्यकारी अभियंता एल.टी.ठाकूर यांनी केले आहे.
(वार्ताहर)