प्रारंभीचे अडीच हजार बळी ३६१ दिवसात; नंतरचे अडीच हजार ६२ दिवसात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:25+5:302021-06-09T04:17:25+5:30
नाशिक : जिल्ह्यातील बळींच्या संख्येने तब्बल ५ हजार बळींचा टप्पा पार केला असून गत हजार बळी तर अवघ्या २५ ...

प्रारंभीचे अडीच हजार बळी ३६१ दिवसात; नंतरचे अडीच हजार ६२ दिवसात !
नाशिक : जिल्ह्यातील बळींच्या संख्येने तब्बल ५ हजार बळींचा टप्पा पार केला असून गत हजार बळी तर अवघ्या २५ दिवसात गेले आहेत. आतापर्यंतच्या बळींच्या संख्येचे वर्गीकरण दोन भागात केल्यास पहिले अडीच हजार बळी होण्यासाठी ३६१ दिवस म्हणजे जवळपास एक वर्षभराचा कालावधी गेला होता. तर त्यानंतरचे अडीच हजार बळी अवघ्या ६२ दिवसात म्हणजे अवघ्या दोन महिन्यात गेले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होऊ लागले असले तरी त्या प्रमाणात बळींच्या संख्येत घट आलेली नाही. नाशिकसाठी मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने सर्वाधिक घातक ठरले. त्यातही एप्रिल आणि मे या दोन महिन्यातच जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळेच चार हजार ते पाच हजार बळींदरम्यानचा टप्पा अवघ्या २५ दिवसात गाठला गेला. त्याआधीचा म्हणजे तीन हजार ते चार हजार बळींचा टप्पा तर त्याहूनही दोन दिवस कमी म्हणजे २३ दिवसातच गेले होते.
इन्फो
गतवर्षी ८ एप्रिलपासून ते यंदा ८ जूनपर्यंत
जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण २९ मार्चला लासलगावला आढळला होता. तर पहिला बळी हा ८ एप्रिल २०२० या दिवशी मालेगावला गेला होता. पहिल्या लाटेतील बाधित आणि मृत्यूचा वेग दुसऱ्या लाटेच्या तुलनेत खूपच कमी होता. पहिल्या लाटेतील प्रारंभीचे १०० बळी जाण्यास ६२ दिवसांचा कालावधी लागला होता. तर प्रारंभीच्या हजार रुग्णांसाठी पाच महिन्यांहून अधिक म्हणजे १५५ दिवसांचा कालावधी लागला होता. त्यानंतर दोन हजारपर्यंत बळी जाण्यास अजून ११८ तर तीन हजारपर्यंत बळींची संख्या जाण्यास अजून १०२ दिवस लागले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यातील प्रत्येकी हजार बळी अनुकमे २३ आणि २५ दिवसातच गेल्याने या दुसऱ्या लाटेची तीव्रताच त्यातून अधोरेखित होते.
इन्फो
सर्वाधिक बळी ग्रामीणमध्ये
जिल्ह्यात गतवर्षी अगदी प्रारंभीच्या काळात मालेगाव भागात वेगाने बळी जात होते. त्यानंतर नाशिक शहरातील बळींच्या संख्येत मोठ्या वेगाने वाढ झाली. तर दुसऱ्या लाटेत एप्रिल आणि मे महिन्यात नाशिक ग्रामीण क्षेत्रातील बळी प्रचंड वेगाने वाढले होते. त्यामुळेच आतापर्यंतच्या पाच हजार बळींपैकी सर्वाधिक बळी हे २४४८ नाशिक ग्रामीणमधील तर त्याखालोखाल बळी हे नाशिक शहरातील २१६४ आहेत. तर मालेगाव मनपा क्षेत्रातील ३१९ आणि जिल्हा बाह्य बळींची संख्या १०० वर पोहोचली आहे.
इन्फ़ो
आतापर्यंतचे बळी आकड्यात
०१ बळी - ०८ एप्रिलपासून
१००० बळी - १५५ दिवसात ( १० सप्टेंबर)
२००० बळी - ११८ दिवसात (७ जानेवारी )
३००० बळी - १०२ दिवसात ( २० एप्रिल)
४००० बळी - २४ दिवसात (१३ मे )
५००० बळी - २५ दिवसात ( ०८ जून )