दिवाळी फराळाला महागाईची फोडणी
By Admin | Updated: October 22, 2016 22:35 IST2016-10-22T22:33:37+5:302016-10-22T22:35:15+5:30
दुकाने सज्ज : बाजारात लगबग

दिवाळी फराळाला महागाईची फोडणी
मालेगाव : दिवाळी म्हटले की, बेसनाचे लाडू, करंजी, शंकरपाळी, चकली, चटपटीत पोहे असे खमंग पदार्थ नजरेस येतात. दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आल्याने फराळाच्या साहित्याची विक्री करणारी दुकाने ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरबरा डाळ आणि फुटाणा दाळ (दाळ्या) यांच्या दरात वाढ झाली आहे.
दिवाळीतले लज्जतदार आणि चटपटीत पदार्थ या सणाची गोडी वाढवितात. सध्या तयार फराळ घेण्याकडे गृहिणींच्या कल असला तरी चार-पाच दिवस स्वयंपाक घरात तळ ठोकून हे पदार्थ बनविणाऱ्या सुगरणी घरोघरी आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीची सुरुवात होत आहे फराळ बनविण्याच्या साहित्याच्या खरेदीने. त्यासाठी सिन्नरच्या बाजारपेठेत महिलांची पावले वळत असल्याचे चित्र आहे. पण यंदा फराळासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या डाळीच्या दरात ऐन सणाच्या तोंडावर वाढ झाली आहे. ही डाळ १४० रुपये किलोवर गेली आहे तसेच फुटाण्याच्या डाळीनेही १६० रुपये किलोचा दर गाठला आहे.
गत वर्षाच्या तुलनेत यंदा बेदाण्याचा दर कमी झाला आहे. दिवाळी जवळ आल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह जाणवत आहे. ग्राहकांची कमी झालेली क्रयशक्ती आणि वाढत्या महागाईचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे.