महागाईमुळे मागीलवर्षीपेक्षा दरात वाढ
By Admin | Updated: November 2, 2015 22:08 IST2015-11-02T22:04:36+5:302015-11-02T22:08:55+5:30
तयार फराळ खरेदीकडे नाशिककरांचा ओढा

महागाईमुळे मागीलवर्षीपेक्षा दरात वाढ
नाशिक : दिवाळी अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घरोघरी दिवाळीच्या स्वागतासाठी विशेष लगबग सुरू आहे. पारंपरिक फराळाला विशेष मागणी असली तरी आजच्या धकाधकीच्या जीवनात, तसेच महिला वर्गदेखील कामानिमित्त घराबाहेर पडू लागल्याने ‘रेडिमेड’ फराळ खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच शहरात ठिकठिकाणी तयार फराळाचे स्टॉल दृष्टीस पडतात.
घरातल्या मुलांना जरी आईच्या हातची चव हवी असली तरी, आपली आई म्हणजेच घरातील अन्नपूर्णा अर्थपूर्ण होऊ लागल्याने घरी फराळ बनविणे शक्य होत नाही म्हणून रेडिमेड फराळ खरेदीला घरातील ‘होम मिनिस्टर’कडून प्राधान्य देण्यात येत आहे. पिवळी शेव, मोतीचूर लाडू, पातळ पोह्यांचा चिवडा, शंकरपाळे, बाकरवडी, रव्याचे लाडू, डाळीच्या पीठाचे लाडू, माहीमचा हलवा, बालूशाही, खुरचंदवडी, करंजी, अनारसे, खोबऱ्याची बर्फी, भाजणीच्या चकल्या अशा रेडिमेड फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असल्याचे भारत प्रॉडक्ट्सचे संचालक प्रकाशशेठ मेघनानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अनेक महिला घरीच चिवडा बनविण्यास प्राधान्य देत असल्याने रेडिमेड चिवडा खरेदीकडे त्या तुलनेने ओढा कमी असलेला दिसून येतो. खासगी क्षेत्रात नोकरी करताना सुट्यांचे प्रमाण कमी असते, तसेच मिळाणाऱ्या मोजक्या सुट्यांमध्ये घरातील इतर कामांना प्राधान्य द्यावे लागत असल्याने फराळाचे सगळेच पदार्थ घरी बनविणे शक्य नसल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या. महागाई वाढल्याने फराळाच्या पदार्थांच्या किमतीमध्ये मागील वर्षीपेक्षा वाढ झाली आहे. १५० रु. किलो ते ३०० रु. किलो या दरात विविध पदार्थांची विक्री शहरातील बाजारपेठेत होत आहे. दिवाळीतल्या विशिष्ट दिवशी साखरेच्या बत्ताशांना धार्मिक विधींमध्ये विशेष स्थान असल्याने बत्तासे निर्मितीचे काम मोठ्या प्रमाणात शहरातील कारखान्यांमध्ये सुरू आहेत. पांढऱ्या रंगांच्या बत्ताशांबरोबरच हिरवे, पिवळे, केशरी, गुलाबी रंगाचे बत्तासे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. (प्रतिनिधी)