वंध्यत्व ही आजची सामाजिक समस्या
By Admin | Updated: September 7, 2016 00:38 IST2016-09-07T00:38:08+5:302016-09-07T00:38:18+5:30
नरहरी मळगावकर : ‘मला बाळ हवंय’ कार्यक्र म उत्साहात

वंध्यत्व ही आजची सामाजिक समस्या
नाशिक : चुकीची जीवनशैली, कामातील ताण-तणाव यामुळे वैवाहिक जीवनात समस्या उद्भवत असून, अनेक जोडप्यांमध्ये वंध्यत्व वाढीला लागले आहे. लग्नानंतर अनेकवर्ष मूलबाळ होत नसल्याने अशा जोडप्यांची समाजात हेटाळणी होते. वंध्यत्व या सामाजिक समस्येवर ‘टेस्ट ट्युब बेबी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञामुळे निश्चितच मदत होईल, असे मत डॉ. नरहरी मळगावकर यांनी केले.
शनिवारी (दि. ३) महाकवी कालिदास कलामंदिर येथे संस्कारवाणी युवक मंडळ आणि हितगुज महिला मंडळ यांच्या वतीने अयोजित ‘मला बाळ हवंय’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. नरहरी मळगावकर यांनी टेस्ट ट्युब बेबी या तंत्रज्ञानातील आक्षेप आणि गैरसमज याबाबत उपस्थितांना माहिती देताना टेस्ट ट्युब प्रणालीतून अपत्यप्राप्ती कशी होते याबाबतही मार्गदर्शन केले तसेच उपस्थित प्रेक्षकांनी विचारलेल्या शंकांचेही मळगावर यांनी निरसन
केले.
डॉ.सोनाली मळगावकर यांनी वंध्यत्वाचे कारणे नमूद करताना अनेक जोडप्यांचे उशिरा विवाह झाल्याने तसेच करिअरच्या दबावामुळे कालांतराने संसारसुखाचा विसर पडत गेल्यावर वंध्यत्वाची लक्षणे दिसून येत असल्याचे सांगितले. लग्नानंतर अनेक जोडप्यांना कार्यक्रमांना बोलावणेदेखील टाळले जाते तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याकडे लक्ष वेधले. डॉ. सोनाली मळगावकर यांनी यावेळी वैद्यकीय चाचण्या आणि सकारात्मक विचारसरणी हे सूत्राचे पालन करण्याचे आवाहन केले.
‘विवाह संस्कार’ या विषयावर जिल्हा सत्र न्यायालयाच्या सहायक अधीक्षक मंजूषा कोठावदे यांनी मार्गदर्शन करताना पती-पत्नीतील वैवाहिक वाद त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर खुप दूरगामी परिणाम करतात. त्यामुळे जोडप्यांचे वाद हे लहान मुलांसमोर शक्यतो होऊ नयेत. तसेच ताणतणाव निवारणासाठी जोडप्यांनी संसारातील आनंददायी बाबी शोधून त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमादरम्यान ‘तारे जमीन पर’सांस्कृतिक कार्यक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माचे संयोजन जितेंद्र येवले, सूत्रसंचालन रसिका वाणी, मीनल वाणी, तर आभार शरद वाणी यांनी केले. (प्रतिनिधी)