इंदिरानगरात पुन्हा बिबट्या?
By Admin | Updated: July 25, 2014 00:27 IST2014-07-24T23:50:28+5:302014-07-25T00:27:49+5:30
इंदिरानगरात पुन्हा बिबट्या?

इंदिरानगरात पुन्हा बिबट्या?
इंदिरानगर : परिसरातील उद्यान कॉलनीतील एका बंगल्याच्या आवारात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच इंदिरानगरातून एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर परिसरात अन्य एक बिबट्या अजूनही वास्तव्यास असल्याची चर्चा सुरू असून, अनेकांनी बिबट्या पाहिल्याचाही दावा केल्याने नागरिकांमधील भीती कायम आहे.
पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बापू बंगल्याजवळील उद्यान कॉलनी परिसरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज अनेकांनी ऐकला. त्यानंतर सहा वाजेच्या सुमारास येथील रहिवासी विपुल कुलकर्णी हे आपल्या बंगल्याच्या बाहेर आले असता त्यांना आवारात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती कळविली. वनविभागाने परिसराची पाहणी करून सदर ठसे हे बिबट्याचे नसल्याचा दावा केला. मात्र, नागरिकांनी आठ दिवसांपूर्वीही श्रद्धा गार्डन परिसरात बिबट्याचे दर्शन घडल्याची माहिती दिली.
दरम्यान, वनविभागाने दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, बिबट्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने गस्तही घालण्यात येत असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)