नाशिक : त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांनंतर आयकर विभागाने नाशिकचे उद्योजक व व्यावसायिकांची तपासणी सुरू केली आहे़ पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर बँक खात्यात एक कोटी रुपयांहून अधिक नोटांचा भरणा करणाऱ्या शहरातील १२५ जणांची यादी तयार करण्यात आली असून, त्यापैकी ४० जणांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे़ विशेष म्हणजे यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश असून, आयकर विभागाच्या या धडक कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे़पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणेस पन्नास दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे़ या कालावधीत बँक खात्यांमध्ये एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरणारे आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत़ नोटिसा बजावण्यात आलेल्या ४० जणांनी सुमारे ५ ते ७ कोटी रुपये बँकांमध्ये भरल्याचे वृत्त असून, या रकमेचा स्त्रोत आयकर विभागाने मागविला आहे़ या रकमेचा स्त्रोत देण्यास संबंधित नोटीसधारक अयशस्वी ठरल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे़ आयकर विभागाने नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये शहरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, पुरोहित, उद्योजक तसेच काही राजकारण्यांचाही यामध्ये समावेश आहे़ नोटाबंदीच्या कालावधीत अनेक बँकांनी या मोठ्या वर्गाला सहकार्य करून त्यांच्या मोठ मोठ्या रकमा भरून घेतल्या आहेत़ बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्याची मुदत संपल्याने बँक खात्यांमध्ये किती रक्कम जमा झाली याचा तपशील आता आयकर विभागाकडे प्राप्त होऊ लागला असून, त्यांनी आपले लक्ष्य या मोठ्या वर्गावर केंद्रित केले आहे़नाशिक शहरातील १२५ जणांची प्रथम यादी आयकर विभागाने तयार केली असून, त्यामध्ये १ कोटीहून अधिक रक्कम बँकेत भरणाऱ्यांचा समावेश असून, त्यापैकी प्रथम ४० जणांना नोटीसा पाठविल्या आहेत़ नोटिसा मिळालेल्यांमध्ये शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाचे नाव आघाडीवर असून, त्याने सुमारे सात कोटी रुपये आपल्या बँक खात्यावर भरल्याचे वृत्त आहे़ आयकर विभागाने या व्यावसायिकाकडून उत्पन्नाचे स्त्रोत मागविले असून, यामध्ये दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
नाशकातील उद्योजक रडारवर
By admin | Updated: December 31, 2016 23:31 IST