मतदानाच्या दिवशी औद्योगिक वसाहत बंद
By Admin | Updated: October 11, 2014 23:23 IST2014-10-11T23:23:29+5:302014-10-11T23:23:29+5:30
मतदानाच्या दिवशी औद्योगिक वसाहत बंद

मतदानाच्या दिवशी औद्योगिक वसाहत बंद
सातपूर : विधानसभा निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे, यासाठी मतदानाच्या दिवशी पगारी सुटी देण्याचा आदेश शासनाने दिला असल्याची माहिती कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांनी दिली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच यावेळीदेखील मतदानाचा टक्का वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीतदेखील औद्योगिक आणि विविध आस्थापनांतील कामगारांना मतदानासाठी पगारी सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली होती. शिवाय जे कामगार मतदान करणार नाहीत, त्यांना पगार देऊ नये, असे कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांनी आस्थापनांना सूचित केले होते. शिवाय कामगार उपआयुक्त कार्यालयाने जनजागृती आणि मदत कक्षदेखील सुरू केले होते. यावेळीदेखील शासनाने औद्योगिक आणि विविध आस्थापनातील कामगारांना मतदानासाठी पगारी सुटी जाहीर केली आहे. या आदेशानुसार उद्योग आणि आस्थापनांनी आपले उद्योग बंद ठेवून कामगारांना पगारी सुटी देणे बंधनकारक आहे. कायम प्रक्रिया उद्योगांना या आदेशातून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. आस्थापनांनी या आदेशाचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा कामगार उपआयुक्तांनी दिला आहे. (वार्ताहर)