इंदिरानगर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी पाच दिवसांपासून बंद
By Admin | Updated: December 8, 2015 22:55 IST2015-12-08T22:53:32+5:302015-12-08T22:55:28+5:30
इंदिरानगर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी पाच दिवसांपासून बंद

इंदिरानगर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी पाच दिवसांपासून बंद
इंदिरानगर : स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतर होणार असल्यामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद करण्यात आला आहे़ यामुळे केवळ नागरिकांचीच नव्हे, तर पोलिसांचीही गैरसोय होत असून, स्थलांतरामुळे हा गोंधळ झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे़
पोलीस प्रशासनाला गत सहा महिन्यांपासून इंदिरानगर पोलीस ठाणे जाखडीनगर येथील स्वमालकीच्या जागेत स्थलांतर करण्यास मुहूर्त सापडलेला नाही़ नागरिकांसह पोलिसांनाही स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होण्याबाबत औत्सुक्यामुळे कोणत्याही परिस्थितीत १ डिसेंबरची तारीखही निश्चित करण्यात आली होती़ त्यासाठी तीन दिवस फर्निचर, विद्युत जोडणी तसेच साफसफाई करण्यात आली़ याबरोबरच जुन्या पोलीस ठाण्यातील बहुतेक महत्त्वाची कागदपत्रे व सामानही हलविण्यात आले आहे़
इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दूरध्वनी स्थलांतरित करण्यासाठी अंबड दूरध्वनी कार्यालयात अर्जही देण्यात आला आहे़, परंतु नवीन पोलीस ठाणे हे इंदिरानगर दूरध्वनी उपकार्यालयाच्या अंतर्गत असल्याने जुना दूरध्वनी बंद करण्यात आला़ गत पाच वर्षांपासून इंदिरानगर परिसरातील नागरिकांना परिचित असलेला २३९७७३३ हा दूरध्वनी क्रमांक पाच दिवसांपासून बंद आहे़ त्यामुळे परिसरातील घटना किंवा दुर्घटनेबाबत या क्रमांकावर संपर्क साधल्यास तो बंद असल्याचे सांगण्यात येते़ १ डिसेंबरला नवीन पोलीस ठाण्यात स्थलांतर होणार नव्हते, तर इंदिरानगर पोलिसांनी दूरध्वनी बंद करण्याची इतकी घाई का? अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे़ (वार्ताहर)