मंगळ मोहिमेमुळे भारताचा जगात दबदबा

By Admin | Updated: September 29, 2014 00:32 IST2014-09-29T00:31:22+5:302014-09-29T00:32:42+5:30

सुरेश नाईक : ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात प्रतिपादन

India's world domination because of the Mars campaign | मंगळ मोहिमेमुळे भारताचा जगात दबदबा

मंगळ मोहिमेमुळे भारताचा जगात दबदबा

नाशिक : भारताने यशस्वी केलेली मंगळ मोहीम जगभरात एक आदर्श मोहीम ठरली असून, अमेरिकेच्या तुलनेत केवळ दहा टक्के खर्चातच भारताने ही मोहीम यशस्वी केल्याने या क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन अवकाश शास्त्रज्ञ सुरेश नाईक यांनी केले.
‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात शेवटचे पुष्प गुंफताना ते ‘भारताच्या चंद्र आणि मंगळ मोहिमा’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले, मंगळाला गवसणी घालण्यासाठी आत्तापर्यंत जगभरातून ५१ मोहिमा राबविल्या गेल्या आहेत. त्यापैकी बहुतांश मोहिमा अयशस्वीच झाल्या आहेत; परंतु कमी इंधनात, कमी खर्चात आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे भारताचे नाव या क्षेत्रात आता अग्रस्थानी असून, उपग्रह सोडण्यासाठी आपल्याकडे इतर देशांच्या रांगा लागल्या आहेत.
चंद्र मोहिमेतही भारताला २००८ साली पहिल्याच प्रयत्नात यश लाभले होते; परंतु मंगळापर्यंत जाण्यासाठी ज्या क्षमतेचा अग्निबाण लागतो तो आपल्याकडे नसतानाही भारतीय शास्त्रज्ञांनी कमी क्षमतेचा अग्निबाण वापरीत हे अवघड काम सहजसाध्य केले. मंगळ पृथ्वीच्या जवळ येण्याचा कालावधी ३६ महिन्यांतून एकदाच येतो. त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठीही भारताकडे केवळ १८ महिनेच शिल्लक होते. त्या काळातच भारतीय शास्त्रज्ञांनी सर्व काम फत्ते करून दाखवित आपला उपग्रह मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या सोडला, अशी माहितीही नाईक यांनी दिली.
यावेळी नाईक यांनी अग्निबाणाची निर्मिती करण्यापासून ते ग्रहांवर उपग्रह उतरविण्यापर्यंत उपग्रहाचा प्रवास कसा होतो हे चलचित्राद्वारे दाखविले आणि उपस्थितांना अवकाशाची सफर घडविली. यावेळी व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, बाळासाहेब वाघ, नेमीचंद पोद्दार, प्रा. गिरीश पिंपळे आदि उपस्थित होते. वसंत खैरनार यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

Web Title: India's world domination because of the Mars campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.