जागतिक स्तरावर भारतीय कविता गौण
By Admin | Updated: July 24, 2016 23:35 IST2016-07-24T23:29:39+5:302016-07-24T23:35:09+5:30
शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा: विष्णू खरे यांनी व्यक्त केली खंत

जागतिक स्तरावर भारतीय कविता गौण
नाशिक : जागतिक स्तरावर भारतीय कवितेला अजिबात स्थान नाही. रवींद्रनाथ टागोरांसारख्या महान कवीनंतर जगाने दखल घ्यावी, असे आपल्याकडे कोणीही झाले नाही. जागतिक कवितेत विश्व प्रतिबिंबित होत असते. आपले कवी मात्र वास्तववादी कविता लिहायला घाबरतात, अशी खंत ज्येष्ठ हिंदी कवी डॉ. विष्णू खरे यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित काव्यवाचन व मुक्तसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी डॉ. खरे यांची मुलाखत घेतली. डॉ. खरे यांनी निरनिराळ्या विषयांवर दिलखुलास मते मांडत नाशिककरांना जिंकून घेतले. याशिवाय आपल्या गाजलेल्या कविताही ऐकवल्या.
आपल्या कवितेच्या शैलीविषयी ते म्हणाले, माझी शैली संवादात्मक आहे. तिच्यातील भावना महत्त्वाची आहे, तिच्यात नाट्यमयतेची गरज नाही. माझ्या कवितेतील भाषा साधीसरळ असते, तिच्यात सौंदर्य वगैरे नसते. तरी ती लोकप्रिय कशी झाली, हे मला कळलेले नाही. मी विषयाचे बंधन पाळले नाही. डोक्यावरून मैला वाहून नेणाऱ्यांवरही कविता लिहिली. विश्व हीच माझ्या कवितेची मर्यादा आहे. मला भौतिकशास्त्रात प्रचंड रस आहे. आपल्याकडे विज्ञान, राजकारणावर कविताच लिहिल्या जात नाहीत. हिंदी कवी वाचत नाहीत, वाचलेले त्यांना समजत नाही. रॅँग्लर परांजपे, जयंत नारळीकर यांच्यासारखी वैज्ञानिक दृष्टीची माणसे हिंदीत झाली नाहीत. त्यामुळे हिंदीला वैज्ञानिक परंपराच नाही. भारतीय कवितेला जागतिक पातळीवर कोठेच स्थान नाही, असे सांगताना ते म्हणाले की, आता डोनाल्ड ट्रम्पवर कविता लिहायला हवी. मी मोदींवर कविता लिहिली तर लोक घाबरले आणि तुम्हाला मारून टाकतील, असे म्हणू लागले; पण मी इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर ते हयात असताना कविता लिहिल्या. सध्याच्या कवींवर सांस्कृतिक दडपण आहे. आपल्या कवी, लेखकांत हिंमत राहिलेली नाही. कवी मुक्तिबोधांनी मराठी संस्कृतीचा आधार घेऊन हिंदी कविता समृद्ध केली; पण नामदेव ढसाळांसारखा कवी हिंदीत होऊ शकला नाही, ही खंत वाटते.
डॉ. खरे यांनी हिंदू धर्मावरही हल्ला चढवला. नऊशे वर्षांपूर्वीचा हिंदू धर्म राहिलेला नाही. सध्याचा धर्म फक्त अमुक देवदेवतांच्या पूजा-अर्चा करा, एवढेच सांगणारा उरला आहे. धर्माची पुनर्मांडणी केल्याशिवाय देशाचा उद्धार होणार नाही, असेही ते म्हणाले. अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, मिलिंद जहागिरदार उपस्थित होते. नरेश महाजन यांनी प्रास्ताविक केले. किशोर पाठक यांनी सत्कार केला. सुरेश गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, सोमवारी (दि. २५) सायंकाळी ६.३० वाजता डॉ. विष्णू खरे व डॉ. एस. एल. भैरप्पा रसिकांशी संवाद साधणार आहेत.