भारतीय संस्कृती विश्वाला जोडणारी :
By Admin | Updated: July 15, 2015 01:42 IST2015-07-15T01:42:00+5:302015-07-15T01:42:24+5:30
सिंहस्थ महापर्वास प्रारंभ

भारतीय संस्कृती विश्वाला जोडणारी :
त्र्यंबकेश्वर : भारतीय संस्कृती ही विश्वाला जोडणारी असून, भारतीय संस्कृतीने आजवर मुस्लीम, ख्रिश्चन, यहुदी, पारसी सर्वच समुदायांना आदर दिला आहे. भारतीय संस्कृती ही विश्वाचे सांस्कृतिक केंद्र असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले. येथील कुशावर्तानजीक उभारण्यात आलेल्या छोटेखानी सभामंडपात सिंहस्थ महापर्वाच्या ध्वजारोहणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर श्रीपंच दशनाम जुना आखाडा पीठाधिश्वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरीजी महाराज, महंत सागरानंदजी सरस्वती, षडदर्शन आखाड्याचे महामंत्री महंत हरिगिरीजी महाराज, महंत राजेंद्रसिंह महाराज, उपाध्यक्ष महंत निर्मलसिंह महाराज, प्रवक्ता महंत डॉ. बिंदू महाराज, महंत नैसर्गिका स्वामी, जुना आखाड्याचे महंत प्रेमगिरीजी महाराज, नारायणगिरी महाराज, निरंजन आखाड्याचे महंत आशिषगिरीजी महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे महंत रमेशगिरीजी महाराज, आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती महाराज, अटल आखाड्याचे महंत उदयगिरीजी महाराज, महंत सतीशगिरीजी महाराज, अग्नि अखाड्याचे महंत दुर्गानंदजी महाराज, महंत रघुगिरीजी महाराज, महंत प्रेमानंद महाराज, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मला गावित, नगराध्यक्ष अनघा फडके, उपनगराध्यक्ष संतोष कदम, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आदि उपस्थित होते. राजनाथसिंह पुढे म्हणाले की, राजकारण्यांनी संतांपुढे बोलायचे नसते, तर संत-महंतांनी दिलेल्या आदेशाचे पालन करायचे असते. भारतीय संस्कृती ही अद्भुत संस्कृती असून, जागतिक पातळीवर भारतीय संस्कृती आजवर सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. पाकिस्तान आणि इंडोनेशियात मुस्लीम बांधवांमध्ये जितक्या जाती आणि पंथ आढळत नाहीत, ते सर्व पंथ भारतात आढळतात. भारतीय संस्कृतीने नेहमीच सर्व धर्मांना मान-सन्मान दिला आहे. विश्वातील पहिला चर्च केरळ (भारतात) उभा राहिला आहे. तर यहुदी आणि पारसी समाजाला सर्वाधिक सन्मान केवळ भारतातच मिळाल्याचे त्यांच्या इतिहासात नमूद आहे. भारतात सर्व जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने शांततेत राहतात. महंत अवधेशानंदगिरीजी महाराज यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, भारतीय संस्कृती ही श्रद्धा, संस्कार, संस्कृती आणि परंपरेची आध्यात्मिक संवेदना आहे. भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक कणाकणात परमेश्वर आहे. भारतीय संस्कृतीने प्रत्येक धर्माचा आदरच केला आहे. जगात संसाराला बाजार समजले, तर भारतीय संस्कृती संसाराला परिवार समजते. येथे अतिथी देवो भव, ही संस्कृती रुजलेली आहे. हिंदू धर्मात सर्व समाजाचे हित जपण्याची ताकद आहे.