भारत जगाला अहिंसेचे मूल्य शिकविणारे राष्ट्र
By Admin | Updated: October 25, 2016 01:17 IST2016-10-25T01:16:40+5:302016-10-25T01:17:51+5:30
डेव्हीड ब्लंडेल : शांतता परिषदेचे प्रथम सत्र

भारत जगाला अहिंसेचे मूल्य शिकविणारे राष्ट्र
नाशिक : जागतिक स्तरावर कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली असून, भारत हे जगाला अहिंसेचे मूल्य शिकविणारे राष्ट्र असल्याचे प्रतिपादन चीनच्या तैवान चेंगची विद्यापीठाचे प्रा. डेव्हीड ब्लंडेल यांनी केले. एमएमआरके महिला महाविद्यालयात १९व्या जागतिक शांतता शिक्षण परिषदेच्या प्रथम सत्रात ‘शांततेचा मार्ग, सहिष्णुता आणि मूल्याधिष्ठित जीवन’ विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, डॉ. प्रियरंजन त्रिवेदी, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, डॉ. अनिल काकोडकर, संस्थेचे सचिव डॉ. एम. एस. गोसावी आदि उपस्थित होते. ब्लंडेल म्हणाले, संपूर्ण जगाने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे चटके सोसले असल्याने सर्वांनी मिळून शांततेच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असून, भारत हे शांततेचे उत्तम उदाहरण आहे.
येथे विविध धर्माचे लोक सामाजिक एकात्मता आणि सर्वधर्मसमभाव एकत्र असून, सहिष्णु वातावरणामुळेच या खंडप्राय देशात कायम शातंता टिकून आहे. भारतात प्रजासत्ताक अस्तित्वात आल्यानंतर शिक्षणाचा प्रचार, प्रसार व विकास झपाट्याने होत असल्याने येथील समाजात मोठा बदल झाला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगासमोर बुद्धांचे विचार मांडून जगाला शांततेचा संदेश दिला असल्याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. दरम्यान, डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण पद्धतीत बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान आधारित बदल घडवून कुशल विद्यार्थ्यांसह कुशल मार्गदर्शन आणि प्रशिक्षकांची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने ग्रामीण आणि शहरी भागातील विषमतेची दरी मिटविण्याचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले, तर डॉ. प्रिय रंजन त्रिवेदी म्हणाले, शांततेचे मूल्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी ‘टीच वन, इच वन’ हे सूत्र आत्मसात करावे, जगासमोर अशांतता ही समस्या असली तरी त्याचे उत्तर दुसरी समस्या बेरोजगारीच्या रूपाने आहे. ही समस्या दूर करण्यासाठी शिक्षणाचा प्रचार-प्रसार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. अरुण निगवेकर यांनी शिक्षकांनी आपली भूमिका बदलत्या काळानुसार बदलली असल्याचे लक्षात घेऊन संशोधनात्मक शिक्षणप्रणाली आत्मसात करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी केले. (प्रतिनिधी)
महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज
जागतिक शांतता परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या द्वितीय सत्रात शांतता, सहिष्णुता आणि मूल्याधिष्ठित जीवन या विषयावरील तैवानच्या शांतता कार्यकर्त्या हुई जी वांग, सीमा बाधुरी व प्रकाश पाठक यांनी ज्ञानाचे परावर्तन शहाणपणात होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. साधना जोशी व डॉ. विजय गोसावी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. एस. आर. खंडेलवाल यांनी केले, तर तृतीय सत्रात ‘अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ या विषयावर अॅड. डेव्हीड जोसेफ यांनी अहिंसेचा प्रचार प्रसार करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. कविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, प्रा. वृंदा भार्गवे यांच्या मार्गदर्शनात ‘उमंग’ हा सांस्कृतिक कार्यक्र मातून शांततेचा संदेश देण्यात आला.