भारत दूरसंचारकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By Admin | Updated: November 2, 2015 23:03 IST2015-11-02T23:01:58+5:302015-11-02T23:03:47+5:30
भारत दूरसंचारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

भारत दूरसंचारकडून शेतकऱ्यांची फसवणूक
मालेगाव : भारत दूरसंचार निगम लिमिटेड कंपनीकडून महाकृषी संचार योजनेचे समायोजन करून नवीन येणारी योजना ही शेतकऱ्यांची फसवणूक करणारी असल्याचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद चव्हाण यांनी भारत दूरसंचारच्या मंडल अधिकाऱ्यांना दिले.
कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी सवलतीच्या दरात संवाद घडावा, म्हणून तत्कालीन आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी २०११ मध्ये कृषी संचार योजना राबविली होती. त्यात १०९, १०८ व १२८ रुपये या प्रकारचे मासिक भाडे होते. यात एक जीबीपर्यंत इंटरनेट डाटा मोफत मिळत होता. इंटरनेटवर्कसाठी ४०० मिनिटे तर बीएसएनएलसाठी १०० मिनिटे, ४०० एसएमएस मोफत मिळत होते. कृषी संचार ते कृषी संचार कार्डधारकांमध्ये अमर्याद बोलण्याची सुविधा होती, परंतु आता भारत दूरसंचार निगमने तीनही कृषी संचार योजेनेचे समायोजन करून नव्या स्वरूपात १ नोव्हेंबरपासून ही योजना लागू करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा हा सरकारचा डाव आहे, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. शासनाने शेतकऱ्यांना अधिक लाभ देणारी कृषी संचार योजना अमलात आणावी, असेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिानिधी)