अपक्ष-रिपाइं नगरसेवकाला आचारसंहितेचा फटका
By Admin | Updated: July 30, 2016 01:31 IST2016-07-30T01:30:12+5:302016-07-30T01:31:06+5:30
पोटनिवडणूक : विकासकामांवर परिणाम

अपक्ष-रिपाइं नगरसेवकाला आचारसंहितेचा फटका
नाशिक : मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार आणि शोभना शिंदे यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर येत्या २८ आॅगस्टला पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासूनच प्रभाग क्रमांक ३५ आणि ३६ मध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. द्विसदस्यीय प्रभाग असल्याने या आचारसंहितेचा फटका अपक्ष नगरसेवक पवन पवार आणि रिपाइंच्या नगरसेवक ललिता भालेराव यांनाही बसणार असून, महिनाभर विकासकामे ठप्प होणार आहेत. त्यामुळे ‘कुणाचे भोग कुणाच्या नशिबी’ अशी चर्चा प्रभागात सुरू झाली आहे.
मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार आणि शोभना शिंदे यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने मनसेच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्तांनी दोघा नगरसेवकांना अपात्र घोषित केले. त्यानुसार त्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर करत येत्या २८ आॅगस्टला मतदान घेण्याचे निश्चित केले. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासूनच प्रभाग क्रमांक ३५ आणि ३६ मध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजे २९ आॅगस्टपर्यंत दोन्ही प्रभागांत आचारसंहिता लागू राहणार असल्याने महिनाभर कोणतीही विकासकामे हाती घेता येणार नाहीत किंवा उद्घाटने, अनावरण सोहळे करता येणार नाही. या आचारसंहितेचा फटका मात्र विनाकारण अन्य दोन नगरसेवकांना बसणार आहे. नाशकात द्विसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात आहे. सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग ३५ (अ) मधून पवन पवार हे अपक्ष म्हणून तर ३५ (ब) मधून शोभना शिंदे निवडून
आल्या होत्या. तर प्रभाग ३६ (अ) मधून रिपाइंच्या ललिता भालेराव
तर ३६ (ब) गटात मनसेचे नीलेश शेलार निवडून गेले होते.
(प्रतिनिधी)
निवडणूक आचारसंहितेमुळे पवन पवार आणि ललिता भालेराव यांची मात्र कोंडी होणार असून सार्वत्रिक निवडणूक ऐन तोंडावर आली असताना विकासकामांची भूमिपूजने अथवा उद्घाटने करण्यास दोहोंनाही मनाई आहे. आचारसंहितेमुळे प्रभागातील विकासकामेही ठप्प होणार आहेत.