मतदान यंत्रांसाठी बांधणार स्वतंत्र गुदामे
By Admin | Updated: January 6, 2017 00:21 IST2017-01-06T00:21:07+5:302017-01-06T00:21:56+5:30
सहा कोटी खर्च : सिद्धप्रिंपीला जागा

मतदान यंत्रांसाठी बांधणार स्वतंत्र गुदामे
नाशिक : प्रत्येक निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदान यंत्रांची मतमोजणीनंतर सुरक्षितता अतिशय महत्त्वाची मानली गेली असून, जिल्ह्यात मतदान यंत्रे ठेवण्यासाठी कोणतीच स्वतंत्र व्यवस्था नसल्याने निवडणूक आयोगाने मतदान यंत्रे ठेवण्यासाठी स्वतंत्र गुदामे बांधण्याचे ठरविले असून, त्यानुसार नाशिक तालुक्यातील सिद्धप्रिंपी येथे सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून गुदाम बांधण्यात येणार आहे.
सध्या गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत वापरली गेलेली मतदान यंत्रे निवडणूक शाखेच्या ताब्यात असली तरी, ती ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने काही मतदान यंत्रे अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाउस येथे तर काही मतदान यंत्रे मेरीच्या सभागृहात ठेवण्यात आली आहेत.
तालुक्याच्या ठिकाणी असलेली यंत्रेदेखील अशाच खासगी किंवा शासकीय, परंतु अडचणीच्या जागेत ठेवण्यात आलेली आहेत. मेरीचे सभागृह राज्य सरकारच्या अखत्यारित असल्याने त्याच्या वापराचा मोबदला देय नसला तरी, सेंट्रल वेअर हाउससाठी निवडणूक शाखेला भाडे मोजावे लागत आहे. शिवाय दोन्ही ठिकाणांचा ताबा वेगवेगळ्या यंत्रणेकडे असल्याने मतदान यंत्रांची सुरक्षिततेचाही घोळ कायम आहे. (प्रतिनिधी)