शिवसेनेचा सिंहस्थात स्वतंत्र ‘आखाडा’
By Admin | Updated: July 15, 2015 01:49 IST2015-07-15T01:49:03+5:302015-07-15T01:49:31+5:30
शिवसेनेचा सिंहस्थात स्वतंत्र ‘आखाडा’

शिवसेनेचा सिंहस्थात स्वतंत्र ‘आखाडा’
नाशिक : साधुग्राममध्ये वाढीव जागेबरोबरच अन्य सोयी, सुविधांची मागणी करून नाकीनव आणणाऱ्या साधू-महंतांच्या नाकदुऱ्या काढताना प्रशासनाची व पर्यायाने युती सरकारातील भाजपा मंत्र्यांची दमछाक होत असताना त्याच साधुग्राममध्ये खासगी जागा घेऊन सेनेच्या माजी आमदारांनी आपल्या धार्मिक गुरूचा स्वतंत्र आखाडा काढला आहे. विशेष म्हणजे सिंहस्थ कुंभपर्वाचे धर्मध्वजारोहण भाजपाचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत असताना, दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साधुग्रामधील सेनेच्या आखाड्याचीही अखंड धर्मज्योत प्रज्वलित करून युतीतील सवतासुभ्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा ताबा भाजपाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व संलग्न आघाड्यांनी घेतल्याने सोमवारीच्या या समारंभापासून भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या सेनेच्या स्थानिक पदाधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींनी दूर राहणेच पसंत केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे या सोहळ्यास अनुपस्थित राहण्यामागे ‘मातोश्री’ दौऱ्याचे कारण दाखविण्यात आले असले तरी, ज्यावेळी धर्मध्वजाची मिरवणूक शहरातून निघत होती त्यावेळी सेनेचे माजी आमदार बबन घोलप हे प्रसिद्धीमाध्यमांना आपल्या ‘आखाड्या’ची माहिती देत होते, त्यामुळे सेनेने जाणूनबुजून या सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होत असताना त्यावर मंगळवारी अधिकृतरीत्या शिक्कामोर्तबही करण्यात आले. घोलप यांचे धार्मिक गुरू हिमालयबाबा यांच्यासाठी तपोवनातील मोक्याची खासगी जागा अधिग्रहित करून त्यावर भव्य आखाडा उभा करण्यात आला असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात या आखाड्यात होम-हवन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातील, तसेच या काळात अखंड धर्मज्योत तेवत ठेवण्यात येणार आहे.